Crime News: Young woman raped after being introduced on Instagram, taken to hotel on pretext of taking her for a spin in Thar car
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका २६ वर्षीय तरुणीला थार गाडीतून फिरवण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
बीड बायपास परिसरातील एका हॉटेलमध्ये गुरुवारी (दि.७) हा भयंकर प्रकार घडला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कपिल ज्ञानेश्वर पाटेकर (रा. जे टॉवर, उस्मानपुरा) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो केटरिंगचे काम करतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी कपिल पाटेकर यांची अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यानंतर पाटेकरने ७ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तरुणीला फोन करून मुकुंदवाडी भाजीमंडई परिसरात बोलावून घेतले. तो तिथे थार जीप घेऊन आला होता.
चल, आपण जीपमधून फेरफटका मारू, असे सांगून त्याने तिला गाडीत बसवले. गप्पा मारत त्याने तिला बीड बायपास परिसरातील हॉटेल स्टोनलीफ येथे जेवणासाठी नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर पाटेकरने पीडितेला पुन्हा मुकुंदवाडी भाजीमंडईत आणून सोडले आणि तेथून पोबारा केला.
या भयानक प्रसंगामुळे पीडिता प्रचंड मानसिक धक्क्यात होती. अखेर सावरून तिने शुक्रवारी (दि. ८) मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. याप्रकरणी पाटेकर विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई करत आरोपी पाटेकरला बेड्या ठोकल्या. शनिवारी (दि. ९) त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तरुणीला जबरदस्तीने पाजली दारू: हॉटेलमध्ये गेल्यानंतर पाटेकरने तरुणीला मद्यपान करण्यासाठी जबरदस्ती केली. तिने नकार देऊनही त्याने जास्त बळजबरी केल्याने तरुणीने नाइलाजाने मद्य प्राशन केले. यामुळे तिला नशा आली आणि मळमळ व डोकेदुखी सुरू झाली.
प्रकृती बिघडून उलट्या होऊ लागल्याचा फायदा घेत, आरोपीने सकाळी साडेअकराच्या सुमारास तिला हॉटेलच्या खोलीत नेले. तिथे तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत पाटेकरने तिच्यावर अत्याचार केला. तरुणीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, नराधमाने तिच्या मानेला चावा घेत तिला जखमीही केले.