Crime News : मुकुंदवाडीत 'भाईगिरी'च्या वर्चस्वातून दोघांवर जीवघेणा हल्ला  file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : मुकुंदवाडीत 'भाईगिरी'च्या वर्चस्वातून दोघांवर जीवघेणा हल्ला

या एरियात फक्त एकच भाई, भिमा भाई म्हणत चाकूने सपासप वार; दोन गुंडांना बेड्या

पुढारी वृत्तसेवा

Crime News: Two attacked in life-threatening assault in Mukundwadi amid turf war for dominance

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडीत वर्चस्वाच्या वादातून गुन्हेगार एकमेकांच्या जीवावर उठल्याचे प्रकार वाढले आहेत. 'एरियातील भाई' बनण्याच्या नादात मध्यरात्री वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या सुबोध भास्कर देहाडे (२४, रा. रामनगर, सिडको) आणि त्याचा मित्र सुमेर पठाण या दोघांना अडवून त्यांच्यावर टोळक्याने चाकूहल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

ही घटना शनिवारी (दि.२०) रात्री १ वाजेच्या सुमारास संजयनगर भागात घडली. मुकुंदवाडी पोलिसांनी याप्रकरणी दोन सराईत गुंडांना बेड्या ठोकल्या आहेत. मिमा बबन साळवे (२१, रा. इच्छामणी हॉटेलजवळ, मुकुंदवाडी) आणि प्रवीण कचरू आंबीलढगे ऊर्फ सोन्या (२०, रा. रामनगर, हनुमान मंदिराजवळ) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुबोध देहाडे हा कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे. शुक्रवारी रात्री तो त्याचा मित्र सुमेर पठाण याच्यासोबत एका मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता. रात्री १ वाजेच्या सुमारास ते दोघे घरी परतत असताना संजयनगर गल्ली नं. ०३ मध्ये आरोपी भिमा साळवे, सोन्या आणि त्यांचा एक अनोळखी साथीदार यांनी त्यांना अडवले.

आरोपी भिमा साळवे याने सुबोधला उद्देशून, "कारे तू लय भाई झाला का? या एरियात फक्त एकच भाई असून, तो म्हणजे भिमा भाई," अशी धमकी दिली. सुबोधने 'मी काय केले?' असे विचारताच, "थांब तुला खतमच करतो," असे म्हणत भिमाने कमरेचा चाकू काढून सुबोधच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला.

सुबोधने डाव्या हाताने वार अडवला असता त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर संतापलेल्या भिमाने सुबोधच्या डोक्यातही चाकूने वार केले. सुमेर पठाण हा त्याला वाचवण्यासाठी मध्ये पडला. मात्र भिमाने सुमेरच्याही डोक्यात आणि हातावर चाकूने वार करत त्याला रक्तबंबाळ केले.

आरोपी सोन्या आणि अनोळखी तरुणाने दोघांना लाथा-बुक्क्यांनी आणि दगडाने बेदम मारहाण केली. "पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास गेले तर तुमचा गेम करीन," अशी धमकी देऊन आरोपींनी तेथून पोबारा केला. त्यानंतर मुकुंदवाडीत ठाण्यात दोन्ही आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन वायाळ करत आहेत.

दोन्ही आरोपींना २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी

उपनिरीक्षक सचिन वायाळ यांनी गुन्हा दाखल होताच आरोपी भिमा साळवे आणि प्रवीण ऊर्फ सोन्या या दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयाने त्यांना २२ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT