Crime News: Obscene act committed against a little girl under the pretext of showing her 'Reels'
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उस्मानपुरा भागात एका ११ वर्षीय चिमुकलीला मोबाईलवर 'रील्स' दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका ४० वर्षीय नराधमावर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदास सो नाजी आढाव (४०, रा. फुलेनगर, उस्मानपुरा) असे या आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याची हर्मूल कारागृहात रवानगी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संग्राम ताटे यांनी रविवारी (दि.५) दिली.
पीडित मुलीची आई नोकरीनिमित्त बाहेर गेल्या होत्या. याचा गैरफायदा घेत आरोपी रामदास याने ३ जुलै रोजी दुपारी चिमुकलीला मोबाईल देण्याच्या बहाण्याने बोलावले. तिथे तिच्याशी अश्लील कृत्य करत तिचा विनयभंग केला.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीने तिला 'तुझ्या आईला आणि भावाला मारून टाकेन', अशी धमकी देऊन सलग ४-५ दिवस हा संतापजनक प्रकार सुरू ठेवला होता. या घटनेदरम्यान एका जागरूक तरुणाने हा धक्कादायक प्रकार पाहिला. पुरावा म्हणून त्याने या कृत्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला आणि तात्काळ पीडितेच्या आईला बोलावून याची माहिती दिली. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने रडत सर्व आपबिती सांगितली. यानंतर आईने थेट उस्मानपुरा ठाणे गाठत फिर्याद दिली.