Crime News : Hotel owner attacked with a knife after a pistol was pointed directly at him
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तंदुरी-चिकन पार्सल दिल्यानंतर बिलाचे ७२० रुपये मागितल्याच्या रागातून बाप-लेकांनी हॉटेल चालकावर थेट पिस्तूल आणि चाकू उगारत जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना १४ जून रोजी पहाटे दीड ते अडीच वाजेच्या सुमारास इब्राहिम घडली. फजल सिकंदर पटेल आणि अरफात फजल पटेल (दोघे रा. हर्मूल) अशी आरोपीची नावे आहेत. फजल हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दोन गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक स्वाती केदार यांनी दिली. दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून, त्यांना १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
समीर अहमद खान (३६, रा. इब्राहिम सिटी) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे पंचायत समितीजवळ शोरमा आणि बर्गरचे हॉटेल आहे. १४ जून रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास समीर हॉटेल बंद करून साफसफाई करत होते. यावेळी फजल आणि त्याचा मुलगा अरफात तिथे आले. फजलने औषध खायचे आहे, मला तंदुरी चिकन पार्सल बनवून द्या, अशी विनंती केली. तोपर्यंत मेडिकलवरून येतो, असे सांगून तो निघून गेला. समीर यांनी पार्सल बनवले, मात्र दोघे परत न आल्याने त्यांनी फजलला फोन केला. फजलने समीर यांना 'पार्सल हर्सलला माझ्या घराजवळ घेऊन या,' असे सांगितले.
पैसे मागताच काढले पिस्तूल समीर पार्सल घेऊन हसूल टी पॉइंटवर पोहोचले. फजल एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओतून तिथे आला. समीर यांनी त्याला पार्सल दिले आणि बिलाचे ७२० रुपये मागितले. पैसे मागताच फजलचा पारा चढला. 'मस्ती मे आया क्या, मुझे पहचानता नहीं क्या, मुझे खाने के पैसे मांगता क्या,' अशी शिवीगाळ करत त्याने थेट पिस्तूल काढले, तर मुलगा अरफातने चाकू काढला.
घाबरलेले समीर घराकडे पळत सुटले. मात्र, आरोपींनी त्यांचा पाठलाग करत दगड-विटांनी मारहाण केली. समीर यांचा शर्टाने गळा आवळण्याचाही प्रयत्न झाला. वाद सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या आई-वडिलांनाही या गुंडांनी मारहाण केली. या गंभीर घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक शेख अन्वर करत आहेत.
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी
यातील आरोपी फजल हा २०१२ सालच्या एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. तर काही दिवसांपूर्वी बनावट पिस्टल प्रकरणातही हे आरोपी आहेत.