Crime News : 'अमिन डेव्हलपर्स'च्या अजितसिंग शिलेदारचा तहसील कार्यालयात राडा file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : 'अमिन डेव्हलपर्स'च्या अजितसिंग शिलेदारचा तहसील कार्यालयात राडा

'घरी जाऊन गावठी कट्टा लावून मारेन'; अपर तहसीलदाराला धमकी

पुढारी वृत्तसेवा

Crime News : Ajit Singh Shiledar of 'Amin Developers' threatened Additional Tehsildar in Tehsil Office

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कार्यालयात घुसून अपर तहसीलदार उमेश पाटील यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, "घराचा पत्ता द्या, घरी जाऊन गावठी कट्टा लावून मारतो," अशी थेट जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 'अमित डेव्हलपर्स'चा भागीदार अजितसिंग दौलतसिंग शिलेदार असे आरोपीचे नाव असून, त्याने अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत अपर तहसील कार्यालयात राडा केला. हा प्रकार मंगळवारी (दि.२१) दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी सहाय्यक महसूल अधिकारी जितेंद्र जाधव (४४) यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजितसिंग शिलेदार याच्याविरुद्ध सिटी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सहाय्यक महसूल अधिकारी जितेंद्र जाधव हे कार्यालयात काम करत होते. अचानक बाहेरून मोठ्याने आरडाओरड करण्याचा आवाज दिलेल्या आल्याने ते केबिनबाहेर आले. त्यावेळी आरोपी अजितसिंग शिलेदार आणि त्याचा एक साथीदार कार्यालयात आरडाओरड करत होते. "अपर तहसीलदार उमेश पाटील कुठे आहे? त्याचा पीए कोण आहे? त्याला फोन लावून आताच्या आता इथे बोलवा, नाही तर कानाखाली मारेन आणि नंगा करून मारेन," अशी मुजोर भाषा वापरत त्याने संपूर्ण कार्यालयात दहशत माजवली.

मी एका महिन्यापासून अपर तहसील कार्यालयात चकरा मारत आहे, पण अपर तहसीलदार उमेश पाटील मला भेटत नाही आणि फोनही उचलत नाही. त्याला आज बघूनच घेतो, तो खूप माजला आहे. त्याच्या घराचा पत्ता द्या, घरी जाऊन त्याला गावठी कट्टा लावून मारतो, अशी थेट धमकी आरोपी शिलेदार याने भर कार्यालयात दिली. एवढ्यावरच न थांबता त्याने अपर तहसीलदार पाटील यांच्याविरुद्ध अत्यंत गलिच्छ आणि अश्लील शिवीगाळ सुरू केली.

अश्लील हावभावाने महिला कर्मचारी रडल्या

आरोपी अजितसिंग शिलेदार याने कार्यालयात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसमोरच अत्यंत अश्लील हावभाव करत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या भयंकर आणि लज्जास्पद प्रकारामुळे सुन्न झालेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या मनास लज्जा उत्पन्न झाली आणि त्या कार्यालयातच रडू लागल्या, असे तक्रारीत म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावला; काढले बाहेर

हा प्रकार पाहून कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र शिलेदार हा त्यांच्याही अंगावर धावून आला. अखेर तिथे उपस्थित असलेले नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांनी मध्यस्थी करत आरोपीला समजावून सांगितले आणि त्याला कार्यालयाच्या बाहेर घेऊन गेले. गुन्ह्याचा अधिक तपास उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT