CRIME NEWS : सराफा दुकानातून बुरखाधारी टोळीने २ किलो सोन्याचे दागिने पळविले file photo
छत्रपती संभाजीनगर

CRIME NEWS : सराफा दुकानातून बुरखाधारी टोळीने २ किलो सोन्याचे दागिने पळविले

सिटी चौकातील न्यू विश्वास ज्वेलर्समधील घटना; चार महिला, दोन साथीदार ग्राहक बनून आले

पुढारी वृत्तसेवा

CRIME NEWS: A veiled gang stole 2 kg of gold jewelery from a bullion shop

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील अत्यंत गजबजलेल्या सिटी चौक भागातील सराफा बाजारात भरदिवसा एका बुरखाधारी टोळीने अत्यंत शिताफीने अंदाजे २ किलो सोन्याच्या दागिन्यांचा डबाच लंपास केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आजच्या बाजारभावानुसार या चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत कोटी रुपयांच्या घरात आहे. ग्राहक बनून आलेल्या चार बुरखाधारी महिला आणि त्यांच्या दोन साथीदारांनी केवळ अर्ध्या तासात ही मोठी 'हातसफाई' केली. गुरुवारी (दि. २०) दुपारी ३ ते साडेतीन वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिस आणि प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, सिटी चौक भागातील सराफा बाजारात न्यू विश्वास नावाने ज्वेलर्सचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी दुकानात ग्राहकांची मोठी गर्दी होती. दुकनातील ११ कर्मचारी ग्राहकांना दागिने दाखविण्याच्या कामात व्यस्त होते. दरम्यान, एक बुरखाधारी महिला दुपारी ३ वाजेच्या सुमारास दुकानात आली.

तेव्हा सेल्समनने त्या महिलेला काय पाहिजे अशी विचारणा केली. हमारे आदमी आ रहे है असे सांगितले. ती उभी असल्याने तिला तोपर्यंत सोफ्यावर बसण्यास सांगितले. दरम्यान, काही वेळात आणखी तीन बुरखाधारी महिला आणि डोक्याला टोपी असलेला साथीदार दुकानात आले. त्यांनी दागिने दाखविण्यास सांगितले.

हळूच एकीने काउंटरच्या खालून हात टाकून मागच्या टेबलवरील दागिन्यांचा बॉक्स काढून घेत टोळीने दुकानातून धूम ठोकली. ही टोळी सुमारे अर्धा तास दुकानात होती. सायंकाळी दागिन्यांचा बॉक्स कमी असल्याने संशय आला. सीसीटीव्ही तापसल्यावर घटना उघडकीस आली. तत्काळ हाकेच्या अंतरावर आलेल्या सिटी चौक पोलिसांनी कळविण्यात आले. पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी पथकासह धाव घेतली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनीही पाहणी केली. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अमोल देशमुख, उपनिरीक्षक अर्जुन कदम, प्रवीण पाथरकर यांच्या पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

काउंटरच्या खालून हात टाकून दागिन्यांचा डबा उचलला

सेल्समन दुसऱ्या एका ग्राहकाला दागिने खरेदी केल्याने पावती बनवीत होता. काउंटरवर दागिने नव्हते. मात्र, मागच्या टेबलवर दागिन्यांचे बॉक्स ठेवलेले होते. ग्राहकांनी मागणी केल्यानंतर मागच्या टेबलावरून बॉक्स समोरच्या काउंटरवर ठेवून दागिने दाखविले जातात. सेल्समन पावती बनविण्यात व्यस्त असल्याची संधी साधून काउंटरसमोर उभ्या असलेल्या चार बुरखाधारीपैकी एकीने खाली बसून काउंटरच्या आत जाण्यासाठीच्या तुटलेल्या फाटकातून आत हात टाकून हळूच दागिन्यांचा बॉक्सच उचलून घेतला.

शेजारी असलेला कर्मचारी त्याच दिशेला एकवेळ बघतो, मात्र काही क्षणात तो मान पलीकडच्या बाजूला वळवतो. त्यानंतर क्षणार्धात टोपीवाल्या साथीदाराच्या मागेमागे चारही बुरखाधारी महिला दुकानातून बाहेर पसार झाल्या. दागिन्यांच्या बॉक्समध्ये गळ्यातील सोन्याच्या चेन, गंठण, ब्रेसलेट असे तब्बल अंदाजे दोन किलोचे सोन्याचे दागिने होते.

रिक्षाने गाठले अमरप्रीत चौक

दुकानातून बाहेर येताच आरोपी गांधी पुतळ्याकडे गेले. त्यांनी पुन्हा दुकानाच्या समोरून जात आतील कानोसा घेतला आणि सिटी चौकाकडे जात असताना एका रिक्षात बसले. पुढे मुख्य चौकात गेल्यावर त्यांनी दोन रिक्षा केल्या. यात एकात केवळ तीन महिला तर दुसऱ्यात एक महिला दोन्ही पुरुष बसले. एक रिक्षा गुलमंडी मार्गे अमरप्रीत चौकात गेली तर दुसरी खडकेश्वर मार्गे अमरप्रीत चौकात गेले. तिथे त्यांनी दोन्ही रिक्षा सोडत दर्गाच्या दिशेने पळ काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT