Crime News : अटकेचा कायदेशीर पेच कायम; तरुणाच्या हत्येतील ६ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी file photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : अटकेचा कायदेशीर पेच कायम; तरुणाच्या हत्येतील ६ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पुन्हा आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचा न्यायालयात स्वतंत्र अर्ज

पुढारी वृत्तसेवा

Crime News: 6 accused in youth's murder remanded to judicial custody

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: रोजाबाग परिसरातील २१ वर्षीय तरुणाच्या निघृण हत्येच्या प्रकरणात रविवारी (दि. २६) न्यायालयाने अटक बेकायदेशीर ठरवून मुक्त केलेल्या सहाही आरोपींना सिटी चौक पोलिसांनी न्यायालयाबाहेरून पुन्हा ताब्यात घेतले होते. या आरोपींना सोमवारी (दि. २७) पुन्हा न्यायालयात हजर केले असता अटकेच्या वैधतेवरून न्यायालयात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.

दोन्ही बाजूंच्या जोरदार युक्तिवादानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.आर. गोरले यांनी या सहाही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आरोपींना रीतसर आणि कायदेशीररीत्या अटक करण्यासाठी पोलिसांच्या वतीने न्यायालयात स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आला असून, त्यावर मंगळवारी (दि.२८) सुनावणी होणार आहे. होते.

शाहीद चारनिया, शेख कदीर ऊर्फ माया, उबैद पटेल, अविनाश भोसले ऊर्फ क्रिश बाबा, शेख राफे आणि अक्षय शिरसाठ अशी या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे आहेत. रविवारी न्यायालयाने मुक्तता करताच पोलिसांनी रात्री त्यांना पुन्हा ताब्यात घेतले होते.

अधिक माहितीनुसार, सोमवारी सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने बाजू मांडताना अॅड. नीलेश घाणेकर यांनी पोलिसांच्या कारवाईवर आणि अटकेच्या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला. एखाद्या न्यायालयाने आरोपींची अटक बेकायदेशीर ठरवून त्यांची कायदेशीर मुक्तता केल्यानंतर, पोलिसांना त्याच गुन्ह्यात त्यांना पुन्हा थेट अटक करता येत नाही. त्यासाठी संबंधित न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे कायद्याने आवश्यक असते, असा युक्तिवाद त्यांनी केला.

तसेच अटक केल्यानंतर आरोपींना २४ तासांच्या आत न्यायालयासमोर हजर करणे बंधनकारक असताना पोलिसांनी या प्रक्रियेचे पालन केलेले नाही, हा मुद्दाही अॅड. घाणेकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत ही दुसरी अटकही बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तर सरकारी वकील श्रीमती देशमुख यांनी पोलिसांची बाजू मांडली.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सहाही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाच्या सुनावणीत पाच आरोपींच्या वतीने अॅड. नीलेश घाणेकर यांनी काम पाहिले, त्यांना अॅड. कुलदीप कहाळेकर आणि अॅड. विश्वजीत ढाकणे यांनी सहकार्य केले. तर आरोपी अक्षय शिरसाठ याच्या वतीने अॅड. करण तुपे यांनी काम पाहिले.

विधिसंमत पद्धतीने अटकेसाठी पोलिसांचा अर्ज

सुनावणीदरम्यान अटकेच्या प्रक्रियेबाबत बचाव पक्षाकडून जोरदार कायदेशीर आक्षेप घेण्यात आल्यानंतर, सिटी चौक पोलिसांनी या आरोपींना विधिसम्मत पद्धतीने अटक करण्याची परवानगी मागणारा स्वतंत्र अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जावर आज (मंगळवारी) सुनावणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या सुनावणीत न्यायालय कोणता निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT