Cracks in Mahavikas Aghadi in the Municipal Corporation elections?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असतानाच महाविकास आघाडीतील अंतर्गत विसंवाद पुन्हा एकदा उघड झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना जागावाटपावर एकमत न झाल्याने काँग्रेस आणि ठाकरे गटाने एकला चलो रे ची भूमिका घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यामुळे शरद पवार गट अडचणीत सापडला असून, वंचित बहुजन आघाडीसोबतही जागावाटपाचे सूत्र अद्याप जुळले नसल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकत्र लढलेली महाविकास आघाडी महापालिका निवडणुकीत मात्र एकसंघ दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यात जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. मात्र प्रत्येक पक्षाची भूमिका आणि अपेक्षा वेगळी असल्याने चर्चा निष्फळ ठरत असल्याचे चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि ठाकरे गटाने स्वतंत्र तयारीला गती दिल्याची चर्चा आहे. शहरातील एकूण ११५ जागांपैकी काँग्रेसकडून ६० जागांची, तर शरद पवार गटाकडून ३० जागांची मागणी करण्यात आल्याचे समजते. ही मागणी ठाकरे गटाला मान्य नसल्याने वाद अधिकच चिघळला आहे.
ठाकरे गटाने समान ताकदीने लढायचे असेल तर समतोल जागावाटप आवश्यक अशी भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीत तडजोडीची शक्यता कमी होत चालल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या सर्व घडामोडींमुळे शरद पवार गट सर्वाधिक अडचणीत आला असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे काँग्रेस आणि ठाकरे गट स्वबळावर जाण्याच्या तयारीत असताना, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीसोबतची चर्चा देखील अंतिम टप्प्यावर पोहोचलेली नाही. जागा वाटपाचे गणित जुळत नसल्याने तिथेही तिढा कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीत एकत्र न लढता सर्वच पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र आघाडी टिकवण्यासाठी अखेरच्या क्षणी चमत्कार होणार की एकला चलो रे चा निर्णय अंतिम ठरणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
तिन्ही पक्षांकडून स्वबळाची तयारी
सत्ताधारी पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र, आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्याने आम्हाला अधिक जागा मिळाव्यात. तसेच शहरात आमच्या पक्षाला मानणारा वर्ग मोठा आहे. तर आमची ताकद कमी नाही. असे म्हणत तिन्ही पक्षांकडून महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून चढाओढ सुरू आहे. हा तिढा सुटत नसल्याने तिन्ही पक्षांकडून स्वबळाची जोरदार तयारी सुरू आहे. जर ही फाटाफूट प्रत्यक्षात उतरली, तर त्याचा थेट फायदा सत्ताधारी महायुतीला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात आले