Cousin murdered by being struck on the head with a hammer following a dispute over money
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पैशाच्या वादाच्या मृत फरेस अलकेसरी वादातून ३२ वर्षीय मामेभावाच्या डोक्यात दोन आतेभावानी हातोडीचे घाव घातले. ही घटना रविवारी (दि. ३०) सकाळी १०:१५ वाजेच्या सुमारास मदनी चौक परिसरात घडली. गंभीर जखमी तरुणाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान सायंकाळी मृत्यू झाला. फरेस अब्दुल अजीज अलकेसरी (३२, रा. पडेगाव) असे मृताचे नाव असून, या हल्ल्यात त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
अहमद खलील बादाम (४०) आणि अदनान खलील बादाम (३५, दोघे रा. बारी कॉलनी) या दोन सख्य्या भावांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणेश ताठे यांनी दिली. यातील अहमद हा चालक, तर अदनान हा जिम ट्रेनर आहे. मृत फरेस हा आरोपींचा मामेभाऊ होता.
याप्रकरणी सय्यद शहेजाद अली उर्फ सिराज नासेर अली (३०, रा. कासाबरी दर्गाजवळ, पडेगाव) याच्या तक्रारीनुसार, तो फर्निचरचे काम करतो. रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याचा मित्र फरेस त्याच्या घरी आला. त्यानंतर दोघे दुचाकीने फारेसच्या घरी गेले. तेथून कार घेऊन दोघे सेंट्रल नाका येथे कचरा गाडी घेण्यासाठी आले. फरेस आणि फिर्यादी सय्यद शहेजाद हे दोघे कचरा गाडी घेऊन मदनी चौकातील टाकळकर सोसायटी येथे आले होते.
तेथील सुपरवायझरसोबत ते बोलत असताना आरोपी अहमद आणि अदनान हे तिथे मोपेडवर आले. आरोपी अहमदच्या हातात दांडा तर अदनानच्या हातात हातोडा होता. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर, अदनान याने हातातील लोखंडी हातोड्याने फारेसच्या डोक्यावर दोन वार केले. हातोड्याचा वार अडवताना फरेस याचा हात फॅक्चर झाला. तसेच, अहमदने लाकडी दांडक्याने त्याच्या मानेवर व डोक्यावर मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. मित्राला वाचवण्यासाठी सय्यद शहेजाद मध्ये पडले असता, आरोपी अदनान याने त्यांच्या डाव्या कानावर हातोड्याने मारून त्यालाही जखमी केले.
यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या शोएब आणि शहबाज यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान फारेस याचा सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेनंतर जिन्सी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अगोदर जीवघेणा हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हत्येचे कलम वाढविण्यात आले. दरम्यान, मृत फरेस याच्याविरुद्ध तीन वर्षांपूर्वी जीवघेणा हल्ला आणि हाणामारी असे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहेत.