Cotton procurement center Government procurement centers closed; Farmers' financial crisis
प्रा. मन्सुर कादरी
सिल्लोड कापूस व मका उत्पादनात देशपातळीवर ओळख निर्माण केलेल्या सिल्लोड तालुक्यात यंदा शासकीय कापूस खरेदी केंद्रे राजकीय व प्रशासकीय गुंत्यात अडकली असून त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उच्च दर्जाचा, लांब धाग्याचा कापूस पिकणारा हा भाग जिनिंग उद्य-ोगासाठी महत्त्वाचा मानला जातो. सिल्लोड व सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या मालकीच्या सहकारी जिनिंग प्रेसिंग संस्था सक्षम असतानाही शासकीय खरेदी केंद्रे बंद ठेवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
सीसीआयमार्फत २० नोव्हेंबर रोजी सिल्लोड शहरातील कृषी फायबर, भगवान बाबा जिनिंग व सिल्लोड तालुका शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग या तीन केंद्रांना अधिकृत कापूस खरेदी केंद्राची परवानगी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात सुरू असलेली दोन शासकीय खरेदी केंद्रे अवघ्या ११ दिवसांतच ५ डिसेंबरपासून बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाने कापूस विक्रीची संधी न मिळता खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात कापूस विकावा लागत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांच्या मते, शासकीय केंद्रे बंद असल्याने खाजगी व्यापाऱ्यांना वरचढ ठरण्याची संधी मिळाली असून बाजारभाव मनमानी पद्धतीने खाली पाडले जात आहेत. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना कापसाला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे.
शेतकऱ्यांचा कापूस व्यापाऱ्यांच्या घशात
शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे यांनी, सहकारी तत्त्वावरील जिनिंगमध्ये मलाई मिळत नसल्याने हेतुपुरस्सर शासकीय कापूस खरेदी केंद्रे बंद ठेवण्यात आल्याचा आरोप केला आहे. राजकीय हस्तक्षेप व अधिकाऱ्यांची आडमुठी भूमिका यामुळे शेतकऱ्यांचा कापूस खाजगी व्यापाऱ्यांच्या घशात जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार
सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वासराव दाभाडे यांनी, फुलंब्री तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू असताना सिल्लोडमध्ये मेडिकल रजेचे कारण पुढे करून केंद्र बंद ठेवणे संशयास्पद असल्याचे सांगितले. हे प्रकार जाणून बुजून शेतकऱ्यांच्या हिताविरोधात घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.