Corporator Mehraj Khan, principal remanded in police custody till May 17
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक आयोगाची दिशाभूल करत तिसरे अपत्य लपवल्याप्रकरणी अटकेत असलेला एमआयएमचा नगरसेवक मेहराज खान आणि त्याला बनावट प्रमाणपत्र देणारा मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दीकी या दोघांना न्यायालयाने बुधवारी (दि. १३) १७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. एका वेगळ्याच गुन्ह्याच्या तपासात नगरसेवकाच्या या बोगसगिरीचे बिंग फुटले होते जुना बाजार परिसरात २६ मार्च रोजी राजकीय वादातून इस्लाम पार्टीचे नेते रफत यार खान यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.
याप्रकरणी नगरसेवक मेहराज खानचा भाऊ मिनाज खान याच्यासह ११ जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश होता. पोलिसांनी या बालकाच्या वयाची खात्री करण्यासाठी शाळेकडून बोनाफाईड प्रमाणपत्र मागवले. त्यात तो बालक मिनाज खान (मेहराजचा भाऊ) याचा मुलगा असल्याचे दर्शवण्यात आले होते. मात्र, पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी शाळेचा प्रवेश निर्गम उतारा तपासला.
तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. सदर बालक मिनाजचा नसून खुद्द नगरसेवक मेहराज खान याचाच मुलगा असल्याचे निष्पन्न झाले. नगरसेवक मेहराजने निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात केवळ दोनच अपत्ये असल्याचे दाखवले होते आणि आपले तिसरे अपत्य भावाच्या नावावर खपवण्याचा प्रताप केला होता. या उलगड्यानंतर सिटी चौक पोलिसांनी थेट फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक निरीक्षक मनोज शिंदे करत आहेत.
बनावट बोनाफाईड
आपले नगरसेवकपद वाचवण्यासाठी मेहराजने मुख्याध्यापकाला हाताशी धरून बनावट बोनाफाईड तयार करण्याचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. अटकेत असलेला मुख्याध्यापक इलियास याने आपल्या शाळेतून अशा प्रकारे आणखी कोणाला बोगस प्रमाणपत्रे वाटली आहेत का? याची आता पोलिसांकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.
शाळा पोलिसांच्या रडारवर
या प्रकरणी मंगळवारी नगरसेवक मेहराज खान, त्याची पत्नी निलोफर, भाऊ मिनाज खान, भावजय इकरा मिनाज खान, मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दीकी, मित्र सज्जू उस्ताद आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहराज आणि मुख्याध्यापक इलियासला पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या, तर अन्य आरोपी सध्या पसार आहेत.