Contractor threatened and robbed for a ₹12 crore commission
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : व्यावसायिक स्पर्धा आणि तब्बल १२ कोटी रुपयांच्या कमिशनच्या वादातून एका औद्योगिक कंत्राटदाराला (इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर) १० ते १२ गुंडांनी भरदिवसा रस्त्यात अडवून लुटले. या गुंडांनी धमकावून त्यांच्या ताब्यातील १५ लाखाची 'इन्होव्हा' कार आणि सव्वातीन लाखाची रोकड बळजबरीने हिसकावून नेली.
याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात सुधीर गोरखनाथ कातकडे (४०, रा. हाऊस नं. १३, अमृत साई गोल्ड सिटी, पैठण रोड) आणि राहुल साहेबराव चाबुकस्वार (४५, रा. पुंडलिकनगर) या प्रमुख आरोपींसह इतर १० ते १२ अनोळखी गुंडांविरुद्ध बीएनएस कलम ३१० (२), ११५, ३५६(२), ३५२, ३५१ (२) (३) आणि ६१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर दादासाहेब बारे (३४, रा. फ्लॅट नं. १०२, शाश्वत रेसिडेन्सी, ईटखेडा) यांची तक्रार आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारे हे औद्योगिक कंत्राटदार आहेत. बुधवारी (दि. ३० सप्टेंबर) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील महिंद्रा शोरूमच्या मागील गल्लीत आर्किटेक्ट भूषण जोशी यांच्याकडे कामानिमित्त गेले होते. त्यावेळी आरोपी सुधीर कातकडे आणि राहुल चाबुकस्वार यांच्या सांगण्यावरून आलेल्या १० ते १२ अज्ञात गुंडांनी ज्ञानेश्वर बारे यांना रस्त्यात अडवून घेराव घातला.
आरोपी कंत्राटदार राहुल चाबुकस्वार हा फिर्यादी ज्ञानेश्वर बारे यांच्याकडे तब्बल १२ कोटी रुपये कमिशन द्यावे, म्हणून दबाव टाकत होता. बारे यांनी घाबरून सांगण्याप्रमाणे वागावे, यासाठीच सुधीर आणि राहुल यांनी ही सर्व घटना घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या १० ते १२ गुंडांनी बारे यांना धाक दाखवत त्यांच्या ताब्यातील इन्होव्हा कार (एमएच-२०-एफयु-७०००) आणि कारमधील ३ लाख २५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने पळवून नेली. बारे यांच्या माहितीनुसार, ही गाडी आणि रोकड आरोपी राहुल चाबुकस्वार यानेच लपवून ठेवली आहे. अधिक तपास एमआयडीसी सिडको पोलिस करत आहेत.