Construction worker dies after falling from eighth floor
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कांचनवाडी परिसरात सुरू असलेल्या एका निवासी इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी आठव्या मजल्यावरून तोल जाऊन खाली पडल्याने एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. संतोष सखाराम गायकवाड (३४, रा. मिलिंदनगर, उस्मानपुरा) असे या मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष गायकवाड हे आपल्या कुटुंबासह उस्मानपुरा भागातील मिलिंदनगरमध्ये राहत होते. बांधकाम मजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कांचनवाडी परिसरामध्ये सुरू असलेल्या एका बहुमजली निवासी इमारतीच्या ठिकाणी सेंट्रिंगचे काम करत होते.
गुरुवारी दुपारपासून ते इमारतीच्या आठव्या मजल्यावर काम करत होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काम करत असताना अचानक संतोष यांचा तोल गेला आणि ते थेट आठव्या मजल्यावरून खाली जमिनीवर कोसळले. या भयंकर अपघातात ते थेट डोके आणि छातीवर आदळल्याने मोठा रक्तस्राव झाला व ते जागीच बेशुद्ध पडले. अपघातानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.