Congress wins in Kannad Municipal Council.
कन्नड, पुढारी वृत्तसेवा :
नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने माजी आमदार नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षपदावर निर्णायक विजय मिळवत सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत.
काँग्रेसच्या शेख फरीन बेगम अब्दुल जावेद यांनी १२७६१ मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारावर ८५८ मतांची आघाडी घेत नगराध्यक्षपद पटकावले. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शेवटपर्यंत चुरशीची लढत झाली. यात राष्ट्रवादीच्या स्वाती कोल्हे यांना ११९०३ दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली तर शिवसेनेच्या अनिता काकासाहेब कवडे यांना तिसऱ्या क्रमांकाची ४१०६ पडली.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मात्र चित्र काहीसे वेगळे दिसून आले. राष्ट्रवादीने दमदार कामगिरी केली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने युतीत १२, तर भाजप तीन अशा एकूण पंधरा जागा जिंकत नगरपरिषदेत सर्वाधिक संख्याबळ मिळविले. काँग्रेसला ६ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना ३ जागांवर मर्यादित राहिली. प्रभाग सात मध्ये अनिस मकबूल शहा यांनी १६५५ मते घेऊन अपक्ष १ जागेवर विजय मिळविला.
या निकालामुळे नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे संख्याबळ अधिक असले तरी नगराध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्याने सत्तासंतुलनाची वेगळीच स्थिती निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे शिवसेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला जाणे हा पक्षासाठी चिंतनाची बाब असून, तसेच महायुतीकडून स्थानिक पातळीवर युती न झाल्याचा थेट फायदा काँग्रेसला झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समन्वयाचा अभाव राहिल्याने मतांचे विभाजन झाले आणि त्याचा लाभ काँग्रेसने घेतला.
या निवडणुकीचा निकाल कन्नडच्या स्थानिक राजकारणाला नवी दिशा देणारा ठरला आहे. नगराध्यक्ष काँग्रेसचा, तर नगरसेवकांत राष्ट्रवादी भाजपचे वर्चस्व असल्याने आगामी काळात विकासकामे, स्थायी समित्यांची रचना आणि सत्तेतील समन्वय या मुद्द्द्यांवर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. सत्तास्थापन प्रक्रियेत कोण कोणत्या पक्षाला पाठिंबा देतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, नगरपरिषदेतील राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
हा विजय सर्व जाती-धर्माचा ही निवडणूक परिवर्तन करण्याची निवडणूक होती. शहरातील मतदारांनी ते परिवर्तन केले आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांना निश्चित विकासाच्या कामात बदल दिसेल.फरीनबेगम अब्दुल जावेद, (नवनिर्वाचित, नगराध्यक्षा, कन्नड)