Congress protests against irregularities in electoral rolls; demands an inquiry
वाळूज, पुढारी वृत्तसेवा मतदारयादीतील कथित गोंधळ आणि मतदानाच्या अधिकाराच्या प्रश्नावरून गंगापूर तालुका काँग्रेस कमिटी व रांजणगाव शेणपुंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी (दि. २५) रांजणगाव शेणपुंजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. 'वोट चोर, गद्दी छोड' आणि 'वोट वाचवा, देश वाचवा' अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध केला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी, मतदारयादीतील संशयास्पद बदलांची निष्पक्ष चौकशी करावी, मतदान व मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांना अटक करावी, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या.
यावेळी बोलताना सूर्यकांत गरड यांनी मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा पाया असल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाच्या धोरणांमुळे लोकशाही मूल्यांवर परिणाम होत असल्याचा आरोप करत मतदारयादीतील संशयास्पद बदल काँग्रेस सहन करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनात जिल्हा सरचिटणीस खालेद पठाण, जिल्हा सचिव सुभाष बनकर, तालुका उपाध्यक्ष रफिकखा पठाण, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष अलीम सय्यद, शहराध्यक्ष शौकतभाई शेख, महिला तालुकाध्यक्ष ज्योतीताई पंडित यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. युवक काँग्रेस, महिला आघाडी, एनएसयूआयचे कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिकही उपस्थित होते.