Congress aggressive against online fertilizer booking
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रासायनिक खतांच्या खरेदीसाठी सुरू करण्यात आलेल्या मोबाईल आधारित ऑनलाईन बुकिंग प्रणालीमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या गैरसोयीच्या निषेधार्थ सोमवारी (दि. १५) केंब्रिज चौकात काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान काही काळ जालना रोडवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
शासनाच्या नव्या खत वितरण व्यवस्थेविरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी केंब्रिज चौकातील आंदोलनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. खतासाठी हेलपाटे बंद करा, शेतकऱ्यांना न्याय द्या, वेळेत खत द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी आंदोलकांनी ऑनलाईन बुकिंग प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना वारंवार कृषी सेवा केंद्रांवर फेऱ्या माराव्या लागत असल्याचा आरोप केला.
तसेच सर्व्हर डाऊन होणे, तांत्रिक अडचणी आणि वितरणातील विलंब यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी त्रस्त झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली, तर खा. डॉ. काळे यांनी शासनाच्या धोरणावर टीका करताना सांगितले की, शेतकरी आधीच नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींशी झुंज देत आहे.
अशा परिस्थितीत खतांसाठी त्याला तासन्तास प्रतीक्षा करावी लागणे आणि वेळेत खत मिळेल की नाही याची चिंता करावी लागणे ही दुर्दैवी बाब आहे. शेतकऱ्याना मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि शेतकरी बांधवांनी व्यक्त केला.
खतासाठी उफाळला शेतकऱ्यांचा संताप
मोबाईल आधारित खत बुकिंग प्रणालीमुळे शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळत नसल्याचा आरोप करत काँग्रेसने केंब्रिज चौकात रास्ता रोको आंदोलन केले. सर्व्हर अडचणी, विलंबित वितरण आणि वाढत्या फेऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त असून, जुनी सुलभवितरण व्यवस्था पुन्हा सुरू करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.