काँक्रीट रस्त्यांनी वाढविले शहराचे 2 सेल्सिअस तापमान file photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar : काँक्रीट रस्त्यांनी वाढविले शहराचे 2 सेल्सिअस तापमान

तब्बल १०८१ कि.मी. लांबीचे रस्ते, हवेची गुणवत्ताही ढासळली

पुढारी वृत्तसेवा

अमित मोरे

छत्रपती संभाजीनगर: सिमेंटच्या उंचच्या उंच इमारतींमुळे अगोदरच शहराच्या तापमानात वाढ झाली आहे. त्यात मागील दीड दशकापासून रस्तेही डांबराऐवजी सिमेंट काँक्रीटचेच करण्यावर भर दिला जात आहे.

शहरातील १४२२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी तब्बल १०८१.३४ किलोमीटर रस्ते सिमेंटचे करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक वसाहतींतील तापमानात तब्बल २ सेल्सिअसची वाढ झाली आहे. त्यासोबतच धुलिकणांमुळे हवेची गुणवत्ताही ढासाळली असल्याचे अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे.

ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहरात २००८ सालापर्यंत जवळपास सर्वच रस्ते डांबरी होते. दरवर्षी विविध रस्त्यांच्या डांबरीकरण आणि देखभाल दुरुस्तीवर सुमारे १२ ते १५ कोटींचा खर्च केला जात होता. परंतु २०१० सालानंतर व्हाईट टॉपिंगच्या नावाखाली शहरात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांना सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून याच रस्त्यांना प्राधान्य देण्यात आले.

अगोदर मुख्य रस्तेच सिमेंटचे केले जात होते. मात्र त्यानंतर अंतर्गत वसाहतींतील सिमेंटचेच 。 आग्रह रस्तेही करण्याचा लोकप्रतिनिधींकडून सुरु झाला. त्यामुळे दीड दशकात संपूर्ण शहरातील डांबरी रस्ते काँक्रीट रस्त्यांमध्ये रूपांतरित झाले आहेत. सध्या शहरातील १४२२.३४ पैकी तब्बल १०८१.३४ किलोमीटर लांबीचे रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे आहेत.

यात सुमारे शंभरहून अधिक अंतर्गत वसाहतींतील रस्त्यांचा समावेश असून, या भागातील तापमानात २ सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे मार्च महिन्यातच शहराचे कमाल तापमान मागील तीन ते चार वर्षांपासून ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे राहत आहे. अंतर्गत वसाहतींमध्ये उष्णतेची झळ रात्री १२ वाजेपर्यंत कायम राहते. त्यानंतर हळूहळू उष्णता कमी होते.

डांबरी रस्ते ३४१ किमीचेच

शहरातील काही वसाहतींमध्ये अजूनही डांबरी रस्ते कायम आहेत. या भागातील 1 लोकप्रतिनिधी काँक्रीट रस्त्यास नकार देतात. त्यामुळे या भागात डांबरी रस्तेच करण्यात येतात. समर्थनगर भागात असेच काही डांबरी रस्ते असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय कोंबडे यांनी दिली.

हवेची गुणवत्ता ढासळली

सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे शहरातील हवेत धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे. ज्या भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे, तेथील रस्त्यांवरील सिमेंटचे सरफेस उखडल्यानंतर धुलिकण हवेत मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचा निष्कर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात आहे.

उन्हाच्या झळा वाढल्या - शहराच्या वाढत्या तापमानाला सिमेंट रस्तेही मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत. या रस्त्यांमुळे उन्हाच्या झळा रात्री उशिरापर्यंत कायम असतात. त्याचा परिणाम शहराच्या तापमानावर होतो आहे. यासोबतच धुलिकणही वाढले आहेत.
श्रीनिवास औढकर, हवामान अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT