छत्रपती संभाजीनगर : धुळे येथील शाळेचा शिपाई कल्पेश अग्रवालसह त्याचा साथीदार सय्यद नबी याला १०० नशेच्या गोळ्यासह गुरुवारी (दि.९) पकडल्यानंतर गुन्हे शाखेने थेट गुजरात आणि मध्यप्रदेशात जाऊन सिरप पुरवठा करणारी टोळी उघड केली. दुर्गेश सीताराम रावत (५४, रा. इंदौर) आणि धर्मेंद्र ऊर्फ गोपाल खेमचंद प्रजापती (३२, रा. अहमदाबाद) यांच्यावर छापे मारूप्न नशेसाठी तस्करी होणाऱ्या तब्बल १८ हजार ३६० कोडीन सिरपच्या बाटल्या जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी बुधवारी (दि.१५) पत्रकार परिषदेत दिली.
पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबरला आमखास मैदानावर नशेच्या गोळ्या विक्रीसाठी आलेल्या कल्पेश चंदुलाल अग्रवाल (३८, रा. धुळे) आणि त्याचा साथीदार सय्यद नबी सय्यद लाल (३७, रा. जोगेश्वरी, वाळूञ्ज) याला गुन्हे शाखेने अटक केली होती. तर ज्ञानेश्वर मनोहर यादव ऊर्फ माऊली (रा. जयभवानीनगर) हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे.
दरम्यान, अग्रवालच्या चौकशीत त्याने इंदौरचा दुर्गेश रावत आणि अहमदाबादचा धर्मेंद्र प्रजापती यांच्याकडून अनेक महिन्यांपासून कोल्ड्रीप सिरपचा साठा आणून नशेसाठी विक्री करत असल्याची माहिती दिली. गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी धुळे, इंदौर आणि अहमदाबाद येथे जाऊन तब्बल १८ हजार ३६० सिरप बाटल्यांचा साठा जप्त केला.
दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. ही कारवाई पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनात उपायुक्त रत्नाकर नवले, एसीपी संपत शिंदे, पोलिस निरीक्षक संभाजी पवार, एपीआय रविकांत गच्चे, ज्ञानेश्वर अवघड, संजय बहुरे, विनायक शेळके, उपनिरीक्षक संदीप काळे, अर्जुन कदम, सहायक फौजदार दिलीप मोदी, जमादार प्रकाश गायकवाड, अश्रफ सय्यद, अमोल शिंदे, नवाब शेख, सागर पांढरे यांनी केली.