City Water Pipelines Cleaning : शहरातील जलवाहिनींची स्वच्छता, मोठ्याप्रमाणात पाणी नाल्यात file photo
छत्रपती संभाजीनगर

City Water Pipelines Cleaning : शहरातील जलवाहिनींची स्वच्छता, मोठ्याप्रमाणात पाणी नाल्यात

सिद्धार्थ उद्यानासमोरील प्रकार, नागरिक संतप्त : पाणी शुद्धतेच्या योग्य पातळीवर येईपर्यंत प्रक्रिया राहणार सुरू, प्रशासनाचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

Cleaning of city water pipelines; large quantities of water flowing into the drain

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मुख्य जलवाहिन्या स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी नाल्यांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानासमोरील नाल्यातून सोमवारी (दि.२१) मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने काही नागरिकांना जलवाहिनी फुटल्याचा भास झाला. मात्र, दीड ते दोन वर्षांपूर्वी टाकलेल्या जलवाहिन्यांमध्ये साचलेली माती, कचरा व गाळ बाहेर काढण्यासाठी व पाण्याची शुद्धता योग्य पातळीवर आणण्यासाठी जलवाहिन्या धुणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

नवीन योजनेतून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी नक्षत्रवाडी येथील संतुलित जलकुंभातून १५००, २००० आणि १११८ मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यापैकी १५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी धुऊन तिच्यातून पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

तर सध्या २००० आणि १११८ मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्या स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या जलवाहिन्या दीड ते दोन वर्षांपूर्वी टाकण्यात आल्या आहेत. या कालावधीत पाइपलाइनमध्ये माती, कचरा व गाळ साचला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू सुरू करण्यापूर्वी हा गाळ व अन्य साचलेले घटक बाहेर काढणे आवश्यक असल्याने कंत्राटदार कंपनीकडून जलवाहिन्या धुण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या प्रक्रियेदरम्यान पाइपलाइनमधील पाणी बाहेर सोडले जात आहे. या जलवाहिन्यांमधून बाहेर सोडले जाणारे पाणी वाहून जाण्यासाठी शहरातील नाल्यांचा वापर केला जात आहे. ज्या ठिकाणी नाले उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी पाइपलाइनमधील पाणी सोडण्यात येत आहे. महापालिकेने या प्रक्रियेबाबत नागरिकांना माहिती दिली आहे.

मात्र, मोठ्या प्रमाणात पाणी नाल्यात वाहताना दिसत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तसेच सोमवारी सिद्धार्थ उद्यानाशेजारील नाल्यात १११८ मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतील पाणी सोडण्यात आले. नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष त्याकडे गेले, अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने काही नागरिकांनी जलवाहिनी फुटल्याचा संशय व्यक्त केला.

त्यातून महापालिका प्रशासनाविरोधात नाराजीही व्यक्त करण्यात आली. दरम्यान, जलवाहिनीतील पाणी प शुद्धतेच्या योग्य पातळीवर येईपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवावी लागणार असल्याचे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी सांगितले. सध्या नाल्यात सोडले जाणारे पाणी हे जलवाहिनी स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेतीलच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१५०० मिमीची लाइन झाली स्वच्छ

नव्या पाणीपुरवठा योजनेतील १५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी धुऊन तिच्यातून पाणी घेण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित २००० आणि १११८ मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांची स्वच्छता सुरू आहे. या दोन्ही पाइपलाइनमधील पाणी शुद्धतेच्या निकषांनुसार योग्य पातळीवर येईपर्यंत जलवाहिनी स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली जाणार आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT