विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर मागणाऱ्या पर्यवेक्षकास नातेवाईकांनी बदडले File Photo
छत्रपती संभाजीनगर

12th Board Exam : विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर मागणाऱ्या पर्यवेक्षकास नातेवाईकांनी बदडले

बजाजनगरातील परीक्षा केंद्रावरील प्रकार ; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

वाळूज महानगर : १२ वीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थिनीला मोबाईल नंबर मागितल्याने पर्यवेक्षकास विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी संस्थाचालकासमोर बदडल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी बजाजनगरातील तनवाणी कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर घडली.

शनिवारी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानतंर गट शिक्षणाधिकारी अरविंद कापसे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिलकुमार सकदेव यांनी सदरील परीक्षा केंद्राला भेट देऊन माहिती घेतली.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार बजाजनगर येथील तनवाणी कॉलेजमध्ये १२ वीचे परीक्षा केंद्र असून याठिकाणी ३६६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. २५ फेब्रुवारी रोजी पेपर संपल्यानतंर परीक्षा हॉलमध्ये पर्यवेक्षक म्हणून ड्युटी करणारे तनवाणी कॉलेजचे प्रयोग शाळा सहायक स्वप्नील इंगळे यांनी एका विवाहित परीक्षार्थिनीचा मोबाईल नंबर मागितला.

यामुळे त्या विद्यार्थिनीने याची तक्रार केंद्र संचालक अर्चना जाधव यांच्याकडे केल्याने याविषयी त्यांनी संस्थेचे संचालक हनुमान भोंडवे यांना कळविले. ते परीक्षा केंद्रावर येताच विद्यार्थिनीचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी आले व त्यांनी हनुमान भोंडवे यांच्यासमोर त्या पर्यवेक्षकास मारहाण सुरू केली. यावेळी भोंडवे यांनी सदरील प्रकरण मिटविण्यासाठी त्या पर्यवेक्षकास माफी मागा असे म्हणतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

अधिकाऱ्यांची परीक्षा केंद्राला भेट

दरम्यान, आज दुपारी गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे, शिक्षण विस्तार अधिकारी अनिलकुमार सकदेव यांनी या परीक्षा केंद्रावर भेट दिली. यावेळी त्यांनी कॉलेजच्या प्राचार्य तथा केंद्र संचालक अर्चना जाधव यांच्याकडून सदरील घटनेची माहिती घेतली. या प्रकरणाचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे यावेळी अरविंद कापसे यांनी सांगितले.

त्या पर्यवेक्षकास सक्तीची रजा

तनवाणी कॉलेजमध्ये प्रयोग शाळा सहायक म्हणून कार्यरत असलेल्या स्वप्नील इंगळे यांना १२ वी परीक्षेसाठी गार्डिंग देण्यात आली आहे. २५ फेब्रुवारी रोजी परीक्षार्थी विद्यार्थिनीला त्यांनी तिचा मोबाईल नंबर मागितल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संस्थेने सदरील पर्यवेक्षकास ७ दिवसांत लेखी खुलासा सादर करावा सांगून असे सांगून सक्तीच्या रजेवर पाठविले असल्याचे प्राचार्या अर्चना जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT