CJP Kya Bolti Public campaign : "आमची विचारधारा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विचारांवर चालणारी आहे. आम्ही सेक्युलर असून आमचा पूर्ण विश्वास संविधानावर आहे. देशातील आजची परिस्थिती आणि शिक्षणाची झालेली दुरवस्था यावर नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी आगामी सप्टेंबर महिन्यात 'क्या बोलती पब्लिक' हे देशव्यापी अभियान राबवले जाणार आहे," अशी घोषणा 'कॉकरोज जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांनी केली. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिक्षण क्षेत्रातील व्यापारीकरणावर जोरदार हल्लाबोल करत दिपके म्हणाले, "आज भारतात शिक्षण घेणे म्हणजे डोक्यावर कर्ज ओढवून घेण्यासारखे आहे. गेल्या काही वर्षांत शिक्षणाचा केवळ व्यवसाय झाला आहे. याविरोधात तरुणांचा राग जंतर-मंतरवर स्पष्टपणे दिसून आला. आज एका पक्षाला मतदान केले तर तो लोकप्रतिनिधी दुसऱ्याच पक्षात दिसतो, यामुळे लोकशाही आणि मतदानावरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे. न्यायव्यवस्थेबाबतही सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहेत. गरिबांना तारखांवर तारखा मिळतात, पण बड्या लोकांची कामे लगेच होतात. सर्वसामान्यांना न्यायाची गरज असते, तेव्हा न्यायालयाकडे वेळ नसतो," अशी खंत दीपके यांनी केली.
देशातील तरुण आणि वाढत्या बेरोजगारीवर बोट ठेवताना ते म्हणाले, "भारतात ३५ वर्षांखालील तरुणांची संख्या ६० टक्के आहे. परंतु आज देशात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नाहीत. ज्यांना नोकरी मिळते, त्यांना तुटपुंज्या पगारात घर चालवणे कठीण जात आहे. उच्चशिक्षित पदवीधर तरुण बेरोजगार फिरत असून, 'पदवी घेऊन आपण चूक केली का?' अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. युवक, शिक्षण आणि बेरोजगारी या ज्वलंत मुद्द्यांकडे सरकारला आता दुर्लक्ष करता येणार नाही." तसेच "२०१४ मध्ये जी चूक झाली, ती पुन्हा करू नका. एखादी व्यक्ती सर्व समस्या एका फटक्यात संपवेल असे सांगत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे," असे आवाहनही दिपके यांनी केले.
"२५ जुलै रोजी देशातील तरुणांनी जे कुणालाही जमले नाही ते करून दाखवले. या देशातील 'जेन झी' (Gen Z) पिढीने सरकारकडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन मोठा विजय मिळवला आहे. मुख्य म्हणजे, गेल्या काही वर्षांपासून देशात पसरलेले भीतीचे वातावरण या तरुणाईने पूर्णपणे संपवून टाकले आहे," असेही ते म्हणाले.