City's water supply likely to be disrupted during Diwali
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी पैठण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नवीन पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीची जोडणीचे काम थांबले होते. त्यामुळे महापालिकेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नियोजित केलेला सहा दिवसांचा शटडाऊन पावसामुळे पुढे ढकलावा लागला होता. आता तो १५ ऑक्टोबरपासून घेण्याचे नियोजन मजीप्राकडून सुरू असून, ऐन दिवाळीत हा शटडाऊन घेतला गेला तर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्यासाठी महापालिका व मजीप्राकडून नवरात्रानंतर सलग सहा दिवसांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पैठण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे डिव्हॉटरिंगचे काम होऊ शकले नाही. जोडणीसाठी आवश्यक असलेले जलवाहिनीचे कोरडेकरण न झाल्याने संपूर्ण प्रक्रिया थांबली होती.
मात्र आता पाऊस थांबला असल्याने पैठण रोडवरील टाकळी फाटा येथे या जोडणीचे महत्त्वाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात शहराला मिळणारे वाढीव ३० एमएलडी पाणी बंद राहणार असल्याने नागरिकांना पाण्याची टंचाई सहन करावी लागणार आहे. शहराला सध्या ७०० आणि १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांमधून पुरवठा केला जात आहे. मात्र काही भागांतील पाण्याचे नियोजन विस्कळीत झाल्याने दैनंदिन पुरवठा बाधित होत आहे.
दरम्यान, नवरात्रोत्सवानंतर घेतला जाणारा शटडाऊन १५ ऑक्टोबरपासून घेण्याचे नियोजन मजीप्राकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा शटडाऊन घेतला गेला तर ऐन दिवाळी सणा-वेळीच शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
दोनवेळा पुढे ढकलला निर्णय
यापूर्वीही या कामासाठी दोन वेळा शटडाऊन घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र पाऊस आणि सण यामुळे शटडाऊन घेण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. परंतू ऐन दिवाळीच्या तोंडावरच प्रशासनाकडून पुन्हा शटडाऊन घेण्याच्या हालचालीमुळे पाण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.