City traffic will get smart turn
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या वाहतुकीचा वेग खुंटवणाऱ्या गोंधळलेल्या सिग्नल व्यवस्थेला आता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्मार्ट टर्न मिळणार असल्याने नागरिकांच्या वेळेचा होणारा अपव्यय, चौकांवरील वाढती गर्दी आणि नियोजनाच्या कमतरतेवर तोडगा म्हणून स्मार्ट सिटी प्रशासनाने एआय आधारित सिग्नल प्रणाली लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यासंदर्भात स्मार्ट सिटीमधील अभियंत्यांनी अभ्यास करून मंगळवारी (दि.९) स्मार्ट सिटी कार्यालयात सीईओ जी. श्रीकांत यांच्यासमोर आराखडा सादर करत सादरीकरण केले. यावरून त्यांनी सेव्हनहिल किंवा क्रांती चौक येथे प्रायोगिक तत्वावर यंत्रणा उभारण्याचे आदेश दिले.
आज शहरात ४२ हून अधिक सिग्नल असून, त्यातील जवळपास निम्मे वापरात नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. वापरात असलेल्या सिग्नलवरही वाहनध ारकांना अनेकदा दोन-दोन फेऱ्या उभे राहावे लागते. कुठे हिरवा सिग्नल सुरू असताना वाहनांची रांग नसते, तर कुठे लाल दिव्याने संपूर्ण चौक ठप्प होतो. ही कोंडी दूर करण्यासाठी स्मार्ट सिटीतील अभियंत्यांनी मंगळवारी एआयवर आधारित सिग्नलचा आराखडा सादर केला. यात स्मार्ट सिटीच्या नेटवर्कमध्ये आधीच बसवलेले ७५० सीसीटीव्ही कॅमेरे आणि इंटरनेटची जोडणी वापरून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
एआय सिग्नल शेवटचे वाहन चौक सोडेपर्यंत लाल दिवा लावणार नाही. उलट चौक रिकामा असेल तर आपोआप लाल लाईट सुरू होईल. त्यामुळे वाहतुकीचा वेग कृत्रिम अडथळ्याशिवाय सुरळीत राहील. तर दुसऱ्या टप्प्यात गुगलसोबतची जोडणीप्रयोग केला जाणार आहे. यात चौकातील सिग्नल सुरू आहे का, गर्दी किती आहे, याची माहिती मोबाईलवर उपलब्ध होणार असून, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या ताफ्यासाठीही हे उपयुक्त ठरणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास त्यांच्यासोबत करार करण्यात येणार आहे.
दरम्यान, सिग्नल व्यवस्थेत होणारा हा आमूलाग्र बदल केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरला तर शहराच्या वाहतुकीला नवा श्वास मिळेल. इंधन बचतीसह नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचेल आणि चौकांवरील गोंधळाचा कायमस्वरूपी शेवट होण्याची आशा आहे.
अन् सिग्नल आपोआप हिरवा होण्याची असणार सुविधा
ग्रीन कॉरिडॉर अॅम्बुलन्स किंवा अग्निशमन दलाची वाहने अनेकदा सिग्नलवर अडकून नागरिकांचे जीव धोक्यात येतात. यावर तोडगा म्हणून अशा वाहनांना खास जीपीएस प्रणाली दिली जाणार आहे. ही वाहने सिग्ग्रलपासून शंभर मीटरवर आली की सिग्नल आपोआप हिरवा होण्याची सुविधा राहाणार असून, हा प्रयोग तिसऱ्या टप्प्यात राबवला जाणार आहे.