City drainage to soon be cleaned by robotic machines
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील ड्रेनेजची रोबोटिक मशिन्सद्वारे सफाई होणार असून, त्यासाठी शंभर कोटींची तरतूद करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत या मशिन्स महापालिकेच्या ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे कोणत्याही सफाई कर्मचाऱ्याने हाताने ड्रेनेजची सफाई करू नये. यापुढे एकही कर्मचारी ड्रेनेजमध्ये उतणार नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे समाज कल्याणमंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी (दि.२४) सांगितले. महापालिकेतर्फे लाडपागे तत्वावर नवनियुक्त कर्मचाऱ्यांना शिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार संजय केणेकर, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन, प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
यावेळी शिरसाट म्हणाले की, रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा तुम्हाला दोन मिनिटे त्रास सहन होत नाही. मात्र माझ्या महापालिकेचे कर्मचारी हाताने ही घाण साफ करतात. तसेच ड्रेनेजचे चोकअप काढताना विषारी गॅसमुळे अनेकांचा मृत्यू झालेला आहे. शहरातील मुकुंदवाडी व सलीमअली सरोवर परिसरासह इतर ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत.
पंरतु यापुढे अशा घटना घडणार नाहीत. कारण समाज कल्याण विभागातर्फे ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करून रोबोटिक मशिन्स खरेदी करण्यात आल्या आहेत. येत्या दोन महिन्यांत या मशिन्स सर्व महापालिकांना मिळतील. त्यामुळे यापुढे एकही कर्मचारी ड्रेनेजमध्ये उतणार नाही. तसेच कोणत्याही सफाई कर्मचार्याने हाताने ड्रेनेजची सफाई करू नये, असे आवाहानही त्यांनी यावेळी केले. दरम्यान, लाडपागे तत्वावर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांचा विषय न्यायालयात सुरू होता. त्यामुळे संबंधित वकिलाला बोलावून घेत सुनावणीदरम्यान न्यायालयात सकारात्मक सांगा, आम्ही त्यांना नियुक्ती देण्यास तयार आहोत, अशा सूचना केल्या.
न्यायालयातून मार्ग मोकळा झाल्यामुळे राज्यातील सर्व महापालिकांना लाडपागे नियुक्तीसंदर्भात शासन निर्णय काढत आदेश दिले, असे शिरसाट यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वित्त व लेखाधिकारी संतोष वाहुळे यांनी केले, तर चारवेळा संधी मिळाली आता बस्स झाले...
महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांचा रेल्वेतील तिकीट कलेक्टर ते आयएएस असा प्रवास असून, काही वर्षात ते राज्याचे मुख्य सचिव होतील, मात्र त्यावेळी मी घरी असेल. राजकारणात टिकून राहणे सध्या अवघड आहे. चार वेळा मला संधी मिळाली. नगरसेवक ते राज्याचा मंत्री झालो. आता बस्स झाले, असे म्हणत शिरसाट यांनी एकप्रकारे राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले.
महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांच्या कार्याचे कौतुक करत माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मिश्कीलपणे प्रशासकांनी एवढे निर्णय घेतले आहेत की आता आमची लोकप्रियताच कमी होत चालली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांत हास्यकल्लोळ पसरला.