छत्रपती संभाजीनगर : शिर्डीहून दर्शन घेऊन रात्रीच्या वेळी शहरात परतलेल्या एका २५ वर्षीय तरुणीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग केला. हा संतापजनक प्रकार सोमवारी (दि.५) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सिडकोतील पिरॅमिड चौकात घडला. चलती क्या? १००० रुपये देतो असे म्हणत तरुणीचा हात पकडून अश्लील कृत्य करणाऱ्या एका रोडरोमिओला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
नीलेश सोपान शिंदे (३२, रा. बजरंग चौक, एन-६, सिडको) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, दुचाकीवरील त्याचा दुसरा साथीदार पसार झाला आहे. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय पीडित तरुणी आणि तिची बहीण शिर्डीहून दर्शन घेऊन बसने सिडको बसस्थानकात आल्या होत्या. त्यांनी घरी जाण्यासाठी कुटुंबातील एका सदस्याला बोलावले होते. मात्र, तो येण्यास वेळ लागणार असल्याने दोन्ही बहिणी पायीच घराच्या दिशेने निघाल्या. त्या पिरॅमिड चौकात आल्या असता, एका लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले.
दुचाकी चालवणाऱ्या नीलेशने तरुणीचा हात पकडून चलती क्या? १००० रुपये देता असे म्हणत अश्लील कृत्य केले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या दोन्ही बहिणींनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी धाव घेतली आणि आरोपी नीलेशला पकडून चांगलाच चोप दिला.
घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी धाव घेत नीलेशला ताब्यात घेतले. पीडितेच्या तक्रारीवरून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार जगताप करत आहेत.
सिडको ते पिरॅमिड चौक परिसर बनला असुरक्षित
सिडको बसस्थानक ते पिरॅमिड चौक या परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर नशेखोर आणि टवाळखोरांचा वावर वाढला आहे. पोलिसांची गस्तीवरील गाडी एकदा फिरून गेली की, येथे पुन्हा काळे धंदे सुरू होतात. गेल्या काही दिवसांपासून या भागात महिलांच्या छेडछाडीचे आणि लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. रात्रीच्या वेळी या भागातून सर्वसामान्य महिला आणि युवतींना जाणे-येणे असुरक्षित झाले आहे. मात्र, बदनामी आणि पोलिस ठाण्याच्या चकरा टाळण्यासाठी अनेकजण तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत.