CIDCO removed the thorny bushes from Devgiri Nagar park.
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : सिडको वाळूज महानगर - १ देवगिरीनगरातील सिडकोचे उद्यान बनले नशेखोरांचा अड्डा या मथळ्याखाली पुढारीने वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागी झालेल्या सिडको प्रशासनाने अखेर उद्यानाच्या साफसफाईचे काम हाती घेतले. शुक्रवार आणि शनिवारी जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने काटेरी झुडपे काढून उद्यानाची स्वच्छता केली. कामाला सुरुवात झाल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच दै. पुढारीच्या वृत्तामुळेच हे काम सुरू झाल्याने सांगत त्यांनी दै. पुढारीचे विशेष आभार मानले.
सिडको प्रशादनाने परिसरात तीन-चार ठिकाणी उद्याने तयार केली आहेत. मात्र या उद्यानाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सर्व उद्यानांची मोठी दुरवस्था झाली आहे. देवगिरीनरातील उद्यानात वाढलेली काटेरी झुडपे, जागोजागी असलेली अस्वच्छता तसेच तुटलेले खेळण्यांचे साहित्यामुळे हे उद्यान भकास झाले आहे. शिवाय उद्यानात वाढलेल्या काटेरी झाडा-झुडपाच्या आडोश्याला बसून टवाळखोर मुले दारू पिऊन गांजाचे झुरके मारत असे. यामुळे या भागात राहणाऱ्या महिला व मुलींना घराबाहेर पडणे अवघड झाले होते. या संदर्भात रहिवाशांनी अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नव्हते. अखेर सिडको वाळूज महानगर- १ देवगिरीनगरातील सिडकोचे उद्यान बनले नशेखोरांचा अड्न या या मथळ्याखाली दैनिक पुढारीने शुक्रवारी (दि.२६) सविस्तर वृत्त प्रकाशित करून नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडली.
पुढारीने वृत्त प्रकाशित करताच सिडको प्रशासनाने याची गंभीर दखल घेत उद्यान साफसफाईचे काम तत्काळ हाती घेतले. शुक्रवारी व शनिवारी दोन दिवस जेसीबीच्या साहाय्याने काटेरी झुडपे काढून उद्यानाची साफसफाई सुरू केली आहे उद्यानाचा एक भाग पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला आहे. तर नाल्याकडील बाजूचे सफाईचे काम सुरू आहे. उद्यानाच्या रखडलेल्या सफाई कामाला सुरूवात झाल्याने या भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासने उद्यानाचे सुशोभिकरण करुन मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसविण्याची मागणी केली आहे.
टवाळखोर दोन दिवसांपासून भूमिगत
पुढारीने वत्त प्रकाशित केल्याने तसेच पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या भागात रात्रीच्या वेळी गस्त सुरू केल्याने उद्यानात रात्री उशिरापर्यंत नशा करणारे व गोंधळ घालणारे टवाळखोरांचे टोळके दोन दिवसांपासून भूमिगत झाले आहे. शुक्रवारपासून या उद्यानकडे कोणीही फिरकले नसल्याने येथील रहिवाशांनी सांगितले.
उद्यान सफाईची नागरिकांचीही जबाबदरी
उद्यानात लहान मुले खेळता. तसेच नागरिकांची उठबस असते. त्यामुळे उद्यान स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच जबाबदारी नाही. आपण आला परिसर स्वच्छ ठेवणे ही येथील रहिवाशांचीही जबाबदारी आहे. असे सामाजिक कार्यकर्ता दत्तात्रय वर्षे यांनी सांगितले.
पुढारी'चे विशेष आभार
अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासन तक्रारीची दखल घेत नव्हते. त्यामुळे उद्यान काटेरी जंगल झाले होते. या झाडांचा फायदा घेत टवाळखोर आडोशाला दारू, गांजा तसेच इतर नशा करणे, मोठ्या आरडाओरड करणे, गाणे वाजविणे आदींमुळे या भागातील रहिवाशांना या टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागत होता. पुढारीने वृत्त प्रकाशित केल्यामुळेच प्रशासनाने दखल घेऊन उद्यान सफाईचे काम सुरू केले असल्याचे सांगत येथील रहिवाशांनी पुढारीचे विशेष आभार मानले आहेत.
लोकवर्गणीतून सीसीटीव्ही
उद्यानांच्या दुरवस्थेमुळे मुलांनी खेळायचे कुठे, असा प्रश्न पालकांसह मुलांना पडला होता. शिवाय हे उद्यान नशेखोरांचे अनधिकृत अड्डा बनल्याने याठिकाणी सर्रास मद्यपान, गांजा ओढणे आणि व्यसनाधीन मुलांचे टोळके रात्री उशिरापर्यंत बसत असे. त्यामुळे आता उद्यानावर नजर ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेत शुक्रवारी लोकवर्गणीमधून या ठिकाणी एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे.