शासकीय आदिवासी वसतिगृहात कचरा सर्वत्र पसरला असून, परिसरात स्वच्छतागृहाची दुर्गंधी पसरली आहे. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Tribal students hostel : विद्यार्थ्यांचे आदिवासी वसतिगृह की कचराकुंडी

दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-८ येथे आदिवासी मुलांचे शासकीय तीन मजली वसतिगृह आहे. या वसतिगृहात सर्वत्र कचरा आणि घाण असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लाखो रुपयांचा निधी असूनही अधिकारी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष दीक्षा पवार यांनी केला.

सिडको एन-८ येथील आदिवासी विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या वसतिगृहाला भेट देण्यासाठी शुक्रवारी (दि.१०) युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष दीक्षा पवार, मोहित जाधव व इतर पदाधिकारी गेले होते. त्यांनी तेथील परस्थिती पाहून अक्षरशः नाकावर रुमाल लावूनच तेथील पाहणी केली.

येथील स्वच्छतागृहांची दुर्गंधी पूर्ण वसतिगृहात पसरली होती. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणीही उपलब्ध नाही. अंघोळीसाठी पाणी तिसऱ्या मजल्यापर्यंत बकेटनेच न्यावे लागत आहे. तीन मजली इमारतीच्या स्वच्छतेसाठी केवळ एकच स्वच्छता कर्मचारी असल्याने येथे स्वच्छता नावालाच होत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी या पदाधिकाऱ्यांना दिली.

...तर कचरा अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये

वसतिगृहात सगळीकडे कचऱ्याचे ढीग आहेत. दोन दिवसांत येथे स्वच्छता न झाल्यास काँग्रेसच्या वतीने कचरा साफ करून तो कचरा अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये टाकण्याचा इशारा दीक्षा पवार यांनी दिला आहे. याबाबत प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दुर्गंधीत वास्तव्य

आदिवासी विभागांकडून भरघोस निधी मिळत असतानाही येथील वसतिगृहात मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. सर्वत्र कचरा, दारूच्या बाटल्या, गेट तुटलेले, दुर्गंधीयुक्त साठवलेले पाणी अशा अवस्थेते येथे १७५ पेक्षा जास्त विद्यार्थी राहतात. असुविधांबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या तर याची साधी दखलही घेतली जात नाही. येथील विद्यार्थी जवळच असलेल्या शासकीय दवाखान्यातून पिण्यासाठी पाणी आणून तहान भागवत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT