Chikalthana police launch 'surgical strike' on criminals
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्ती, महामार्गावरील लुटीच्या टोळ्या आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ३० व ३१ ऑक्टोबर दरम्यान पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली हद्दीत विशेष कोम्बिंग व कारवाई मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत गोवंश तस्करी, धुळे-सोलापूर महामार्गावरील जबरी चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि अवैध दारू तंबाखू विक्री करणाऱ्यावर एकापाठोपाठ एक गुन्हे नोंदवून पोलिसांनी आरोपींना गजाआड केले.
लुटमार करणारी टोळी अवघ्या ५ तासांत जेरबंद
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव पुलाजवळ ३० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास एका प्रवाशाला अडवून बेदम मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून चिकलठाणा पोलिसांनी अवघ्या पाच तासांच्या आत तीन सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सौरभ मुकुंद शिनगारे (रा. मुकुंदवाडी), अरुण सुनील शिंदे (रा. संजयनगर, मुकुंदवाडी), आणि साहिल कैसर शेख (रा. पडेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. या तिघांकडून लुटीतील १८ हजार रुपये किमतीचे ९ भार चांदीचे ब्रेसलेट आणि २ हजार २०० रुपयांची रोख रक्कम असा २० हजार २०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
वडगाव खुर्द शिवारात कारसह ४०० किलो गोमांस जप्त
वडगाव खुर्द परिसरामधून वाहनातून गोमांसाची वाहतूक केली जात असल्याची माहिती ३१ ऑक्टोबर रोजी चिकलठाणा पोलिसांना मिळाली. त्यानुसार सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास सापळा रचून युको कार (क्र. एमएच-०२- एव्ही- ५३८७) जप्त केली. त्यामधून ४०० किलो गोमांस आणि ३ लाखांचे वाहन असा एकूण ४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपी पठाण फकीर मोहम्मद जमाल खाँ (रा. वडगाव खुर्द) याच्यासह सिल्लेखाना परिसरातील जाफर फारुख कुरेशी, वशीम शाकीर कुरेशी आणि इब्राहीम राजमोहम्मद कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरोड्याच्या तयारीत असलेले दोघे ताब्यात
गोपाळपूर शिवारात ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेरून पकडले. अटक करण्यात आलेल्या अरबाज अक्रम खान आणि अमान मिनाज शेख (दोघे रा. कैसर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे चाकू आणि मिरची पावडर मिळून आली. रात्रीच्या वेळी प्रवाशांना लुटण्याच्या उद्देशाने ते दबा धरून बसल्याचा संशय असून, त्यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच- २०-जीजी-११८) सह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.