Chief Minister's Relief Fund 25 crores help to 3 thousand patients of Marathwada
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत मराठवाड्यातील ३ हजार ३९ रुग्णांना २५ कोटी ५८ लाख ३१ हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे. जानेवारी ते जून २०२५ पर्यंत म्हणजेच या सहा महिन्यांत निधीचा हा आधार आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांना मिळाला आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून २० गंभीर आजारांवर मदत केली जाते. यात कॉक्लियर इम्प्लांट, हृदयविकार, किडनी, लिव्हर, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, नवजात बालकांचे आजार, मेंदू विकार, डायालिसिस, भाजलेले रुग्ण, विद्युत अपघात आदींचा समावेश आहे. वैद्यकीय मदतीचा आधार जास्तीत जास्त रुग्णांना तातडीने मिळावा.
यासाठी जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आले. यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. त्यासोबतच आरोग्य शिबिर व रक्तसंकलन आदी उपक्रम प्रभावीपणे राबविणे सहज शक्य होत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.
१ मे ते २५ जुलै दरम्यान जिल्हा कक्षाच्या मदतीने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात घेण्यात आलेल्या आरोग्य व रक्तदान शिविरांमध्ये १२,४०९ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर २,३५३ नागरिकांनी रक्तदान केले.
मागील सहा महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६३३ रुग्णांना ५ कोटी ३३ लाख ३८ हजारांची मदत करण्यात आली. बीड -६१० रुग्णांना ४ कोटी ८९ लाख ६ हजार, परभणी ५३३ रूग्णांना ४ कोटी ६७ लाख ८२ हजार, लातूर ३८५ रूग्णांना ३ कोटी २९ लाख ५५ हजार, जालना ३६७ रूग्णांना ३ कोटी ११ लाख ४५ हजार, नांदेड ३२३ रूग्णांना २कोटी ८० लाख २० हजार, धाराशिव २५७ रूग्णांना २ कोटी २१ लाख आणि हिंगोली १३२ रूग्णांना १ कोटी १६ लाख रूपये प्रमाणे वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.