Chief Minister Fadnavis: We have delivered, and we will deliver again
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यतील रखडलेल्या विकास कामांवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तालयासमोर गुरुवारी (दि. १७) धरणे आंदोलन केले. परंतु, त्यांचे आंदोनल हे नाकर्त्यांचे आंदोलन असल्याचा टोला लगावत, आम्ही करून दाखविले आणि आताही करून दाखवू म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
मराठवाड्यात मागील आठवडाभरापासून उबाठा शिवसेनेचे तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन सुरू आहे. बुधवारी रात्री या आंदोलनासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईहून संभाजीनगरमध्ये आले. त्यांनी धरणे आंदोलन शहरात येताच सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर गुरुवारी त्यांच्या नेतृत्त्वात विभागीय आयुक्तालयासमोर झाले.
या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता. ते म्हणाले की, आम्ही यापूर्वीही करून दाखविले आणि आताही करून दाखवू, ठाकरे यांचे हे आंदोलन म्हणजे नाकर्त्यांचे आंदोलन आहे, असा टोला त्यांनी लगावला. तर काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वतःच्या पाठीला कणा आहे का, हे तपासावे. सकाळी एक बोलतात आणि संध्याकाळी दुसरेच बोलतात,' असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतले, त्यावर समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सरकारच्या उपसमितीने मान्य केलेल्या मागण्या तसेच दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात येईल. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका कायम सकारात्मक राहिली आहे, आतापर्यंत जे निर्णय सरकारने घेतले. ते यापूर्वीच्या एकाही सरकारने घेतलेले नाही, असा दावा देखील त्यांनी केला. आंदोलन शांततेत संपल्याने सणासुदीच्या काळात कोणतेही विघ्न आले नाही, याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त करीत आमदार प्रसाद लाड, मंत्री उदय सामंत आणि उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे अभिनंदन केले.
राज्यात महिनाभर सेवा उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुढील महिनाभर विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली काम करू, असेही ते म्हणाले.