Chief Minister Fadnavis: Take a decision on the alliance within two days.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेसाठी शिवसेना-भाजपमध्ये जागा वाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यात मंगळवारी (दि. २३) शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुंबईत गेलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चचर्चा केली. त्यात युतीच्या जागा वाटपाचा निर्णय २५ डिसेंबरपर्यंत घ्या, असे आदेश त्यांनी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना केली.
महापालिका निवडणुकीसाठी युती करण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांनी दिल्यानंतर भाजप आणि शिव-सेना यांच्या पहिली बैठक गेल्या आठवड्यात पार पडली. या बैठकीनंतर मागील आठवडाभरापासून दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहेत. मात्र अजूनही जागा वाटपावर दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरूच आहे. शिंदेसेनेने दिलेल्या प्रस्तावाला भाजपकडून नकार देण्यात येत आहे.
यंदा शहरात तागद वाढल्याचा आणि इच्छुकांचा आकडा दाखवून भाजप वाढीव जागेची मागणी करीत आहे. त्यामुळे चौथी बैठकही फेल ठरली. दरम्यान, सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देणारे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी मंगळवारी (दि.२३) भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केनेकर आणि शहराध्यक्ष शितोळे, निवडणूक प्रमुख समीर राजूरकर यांच्याकडून युतीसाठी सुरू असलेल्या बैठकांचा आढावा घेतला.
त्यात जागाच्या वाटपावरून मतभेत सुरू असल्याचे सर्वच पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तेव्हा सामंजस्याने चचर्चा करून प्रभागांतील मतभेत मिटवा आणि दोन दिवसांत म्हणजेच २५ डिसेंबरपर्यंत शेवटचा निर्णय कळवा, असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आज पुन्हा बैठक
युतीच्या जागा वाटपाबाबत आज पुन्हा भाजप शिवेसना यांची बैठक होणार आहे. यात जो काही निर्णय होईल, त्याबाबतची माहिती प्रदेश कार्यालयाला सादर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.