Devendra Fadnavis : हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी आरशात बघावे  Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

Devendra Fadnavis : हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी आरशात बघावे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सेनेच्या आज शनिवारी होणाऱ्या हंबरडा मोर्चावर टीका केली.

पुढारी वृत्तसेवा

Chief Minister Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री असताना अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करूनही अडीच वर्षांत त्यांच्या खात्यात एक पैसाही जमा केला नाही. तेव्हा हंबरडा मोर्चा काढण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी एक वेळा आरशात बघावे. त्यानंतर ते असे मोर्चे काढणार नाहीत, असा टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सेनेच्या आज शनिवारी होणाऱ्या हंबरडा मोर्चावर टीका केली. भाजपच्या विभागीय आढावा बैठकीनिमित्त ते शुक्रवारी (दि.१०) शहरात आले होते.

चिकलठाणा विमानतळावर आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुशंगाने विभागनिहाय बैठका आयोजित केल्या आहेत. त्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो आहे. याअगोदर नाशिक विभागाची बैठक झाली आहे. या बैठकीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांच्या निवडणुकीची काय तयारी झाली आहे. पुढे संघटनात्मक रचना कशी करायची आहे. युतीसंदर्भात विषय आहे. या सर्वांवर आजच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येत आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आज शनिवारी होणाऱ्या हंबरडा मोर्चावर त्यांनी सडकून टीका केली.

दरम्यान, ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी २० हजार कोटी रुपयांची कर्ज माफी केली. तेवढीच आम्हीही केली आहे. या उलट त्यांनी चालू खाती असलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. परंतु अडीच वर्षांत फुटकी कवडीही त्यांनी शेतकऱ्यांना दिली नाही. त्या १६ लाख शेतकऱ्यांचे पैसे आमचे सरकार आल्यावर आम्हीच जमा केले, असेही फडणवीस म्हणले. आताही आम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३१ हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यातील २२ हजार कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यांच्या कर्जमाफीच्या घोषणेपेक्षा जास्त निधी आम्ही शेतकऱ्यांना दिला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज हंबरडा मोर्चा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने शनिवारी (दि. ११) शहरात हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघणार असल्याची माहिती पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

दानवे यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथून मोर्चाला सुरुवात होईल. गुलमंडी येथे जाऊन मोर्चाचा समारोप होईल. त्यानंतर एक शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांना जाऊन निवेदन देणार आहे. पीक विमा योजनेचे निकष पूर्ववत करावेत, जनावरे दगावल्याबद्दल भरीव मदत द्यावी, सरसकट कर्जमुक्ती करावी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. परंतु हे पॅकेज फसवे आहे. असे दानवे यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी पाहणी करावी : खैरे

याआधी दुष्काळ पडला होता, तेव्हा आम्ही पंतप्रधानांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी केली होती. तेव्हा पंतप्रधान आले नव्हते. आता ओला दुष्काळ आहे. आता तरी पंतप्रधानांनी यावे, परंतु केंद्र सरकारला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काहीही पडलेले नाही, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT