Chhatrapati Sambhajinagar ZP New Building Approval 
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar ZP New Building Approval| बहुमताने जि. प. च्या नव्या इमारतीला १४ कोटी

फर्निचर आणि अनुषंगिक कामांसाठी उपकर निधीतून मंजुरी; विरोधानंतर ठराव संमत

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नवीन जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीसाठी फर्निचर व अनुषंगिक कामांसाठी उपकरातून १४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंगळवारी (दि.३०) झालेला विरोध अखेर बहुमताच्या जोरावर फेटाळण्यात आला. त्याचवेळी इमारतीजवळ नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी ६५० चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे फर्निचर व वीज सुविधांबाबतचे दोन्ही अडथळे दूर होऊन मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण करण्यास गती मिळणार असून, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग एकाच छताखाली स्थलांतरित होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

नवीन प्रशासकीय इमारतीसाठी फर्निचर व अनुषंगिक कामांसाठी १४ कोटी रुपयांचा निधी उपकरातून उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर सभेत सविस्तर चर्चा झाली. सदस्य, डॉ. राधाकिशन पठाडे, विद्या गायकवाड, देवीदास पालोदकर यांनी प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला. उपकराचा निधी विकासकामांसाठी वापरण्यात यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली, मात्र जिल्हा परिषदेचे विविध विभाग सध्या शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असल्याने प्रशासनाच्या कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे नवीन इमारत तातडीने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करणे गरजेचे असल्याचे मत पंकज ठोंबरे, संजय निकम, मनोज गायके, केतन काजे, रतन बत्तीसे आणि प्रतीक्षा कापसे यांनी मांडले.

त्यानंतर बहुमताने १४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. सभेत नवीन प्रशासकीय इमारतीसाठी अखंड वीज पुरवठ्याच्या दृष्टीने इमारतीलगत नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मालकीची सहा गुंठे जागा उपलब्ध करून देण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला. याशिवाय जिल्हा परिषदेच्या मालकीच्या भूखंडांचा बीओटी तत्त्वावर विकास करण्यासाठी वास्तुविशारद व सल्लागार नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेसाठी नवीन वकिलांचे पॅनेल विकसित करण्याची मागणी सदस्य पंकज ठोंबरे यांनी केली.

वैजापूर येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्या ठिकाणी शॉपिंग मॉल उभारून उत्पन्न वाढविण्याची मागणी सदस्य संजय निकम यांनी केली. त्यावर जिल्हा परिषदेच्या मालमत्तांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, त्या टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येतील, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी स्पष्ट केले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवून त्या जागेवर गाळे उभारावे, अशी मागणी सभापती कल्याण गायकवाड यांनी केली.

वाळूज (ता. गंगापूर) येथील समता कॉलनीतील निळ्या झेंड्याशेजारील कथित अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट सर्वसाधारण सभेत घुसून मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्याकडे मागणी केली. यावेळी अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी मध्यस्थी करत विषयावर चर्चा घडवून आणली. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी कायम ठेवत पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीचे आश्वासन दिले.

फर्निचरवर निधी खर्च नका : डॉ. पठाडे

सभेत इमारतीच्या फर्निचरसाठी उपकरातून १४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याच्या प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे गटनेते तथा सदस्य डॉ. राधाकिसन पठाडे यांनी मतदारांना विकासकामांचे आश्वासन देऊन निवडून आलो असून, केवळ इमारती बांधणे हा जिल्हा परिषदेचा अजेंडा नसल्याचे स्पष्ट केले. सामान्य नागरिकांसाठी रस्ते, पाणी, शाळा, वर्गखोल्या आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. उपकराचा निधी इमारतीच्या फर्निचरवरच खर्च केला, तर या मूलभूत सुविधा देण्यासाठी निधी कोठून आणायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

वेरूळच्या विश्रामगृहाची तातडीने दुरुस्ती करा : दांडगे

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र वेरूळ येथे घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. अशावेळी वेरूळ येथील विश्रामगृहाची दुरवस्था भाविकांच्या सोयीसाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे या विश्रामगृहाची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अशी ठाम मागणी सदस्य कुणाल दांडगे यांनी केली

'तो' निधी विकासासाठीच : गायकवाड

जिल्हा परिषद उपकर निधीतून नवीन प्रशासकीय इमारतीसाठी फर्निचर व इतर अनुषंगिक कामांवर १४ कोटी खर्च करण्याच्या प्रस्तावाला सदस्य विद्या गायकवाड यांनी यावेळी ठाम विरोध केला. उपकर निधी हा ग्रामीण भागातील रस्ते, शाळा, अंगणवाड्या, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, समाजमंदिरे व इतर मूलभूत विकासकामांसाठी राखीव असून, तो कार्यालयीन सुविधांवर खर्च करणे जनहिताच्या विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अनुसूचित जाती नवबौद्ध वस्ती योजनेतील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून लाभार्थीना न्याय देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पहिल्याच सर्वसाधारण सभेत ३१ ठराव मंजूर

जि.प.ची पहिलीच सर्वसाधारण सभा अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, बांधकाम सभापती सचिन गरड, समाजकल्याण सभापती बालाजी सोनटक्के, शिक्षण सभापती अनिता मोठे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सचिव राघवेंद्र घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मौलाना आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात झालेल्या सभेत प्रशासकीय इमारतीच्या उपकरातून १४ कोटी देणे, सबस्टेशनसाठी जागा देणे, बीओटीवर जागा विकसित करणे, राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रमाअंतर्गत ३७आयुष दवाखाने स्थापन करणे अशा ३१ विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT