Chhatrapati Sambhajinagar ZP pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar ZP : जिल्हा परिषदेतील फर्निचर खरेदी संशयाच्या भोवऱ्यात

ई-निविदा, कोटेशन न मागवता केला व्यवहार; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न !

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि तीन सभापतींच्या दालनांसाठी फर्निचरची खरेदी कोणतीही ई-निविदा न काढता अथवा कोटेशन न मागवता करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रक्रियेत प्रशासनाकडून शासकीय नियमांचे पालन झाले नसून, प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता सारवासारव सुरू असल्याची माहिती विश्वासनिय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय निधीतून कोणताही खर्च करताना ई-निविदा प्रक्रिया राबविणे किंवा विविध पुरवठादारांकडून दरपत्रके मागविणे आवश्यक असते. मात्र या खरेदीसाठी अशी कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संबंधित सभापतींकडून नव्या फर्निचरची मागणी करण्यात आली नव्हती. असे असतानाही प्रशासनाने फर्निचर खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्याचे सांगितले जात आहे.

सुरुवातीला अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींसाठी लागणारे टेबल-खुर्चा व अन्य साहित्य एकत्रित निविदेतून खरेदी करण्याची तयारी होती. मात्र प्रकार उघड झाल्याचे लक्षात येताच आता प्रत्येक विभागाकडून स्वतंत्र निविदा दाखविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, अध्यक्ष व सभापतींच्या दालनांच्या दुरुस्तीसाठी ४० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. तसेच फर्निचर, टेबल-खुर्ची खरेदीसाठी प्रत्येक विभागाकडून स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी संबंधित विभागाकडे आहे.

फर्निचर खरेदी असो किंवा दालन दुरुस्ती, ही प्रक्रिया प्रशासनाने राबविली आहे. यामध्ये असा काही प्रकार घडला असेल तर माहिती घेतो. माझा त्याच्याशी कोणताही संबंध नाही, मात्र या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होणार नाही, हे मात्र खात्रीने सांगतो.
अविनाश गलांडे, अध्यक्ष, जि.प.
या प्रकरणात कोणत्याही प्रकारची अनियमितता होणार नाही, याची काळजी मी घेत आहे. याबाबत संबंधित विभागाकडून सर्व माहिती मागविली असून, या प्रक्रियेवर माझे पूर्णपणे लक्ष आहे.
सचिन गरड, अर्थ व बांधकाम सभापती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT