छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar crime: क्षुल्लक कारणावरून तरुणावर ब्लेडने प्राणघातक हल्ला; एक जण गंभीर जखमी

या प्रकरणात आरोपी अफजल अन्वर पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

बिडकीन : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर ब्लेडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना बिडकीन येथे घडली आहे. या हल्ल्यात समीर यासीन पठाण हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी सायंकाळी फिर्यादी मुन्ना रफीक शेख (वय २३) आणि त्याचा मावस भाऊ समीर यासीन पठाण हे दोघे काम आटोपून घरी परतले होते. त्यानंतर ते चहा पिण्यासाठी दुचाकीवरून जात असताना, अफजल अन्वर खान पठाण याच्या दुकानासमोरून जात होते. यावेळी अफजल याने कोणत्याही कारणाशिवाय दोघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुन्ना शेख याने या शिवीगाळीचा जाब विचारला असता, संतापलेल्या अफजलने जवळच्याच किराणा दुकानातून ब्लेड आणले आणि समीर यासीन पठाण याच्या मानेवर वार केला.

गंभीर प्रकृती आणि पोलीस कारवाई

हल्ल्यानंतर समीर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर, आरोपी अफजल अन्वर पठाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल भास्कर खुळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT