Crime News pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : मित्राचे भांडण सोडविणाऱ्याला घरात घुसून बेदम मारहाण

८० हजारांची रोकड लुटली; तक्रार देण्यासाठी जाताच सातारा पोलिस ठाण्याजवळही पुन्हा मारहाण; ११ जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मित्राच्या भांडणात मध्यस्थी करून वाद सोडवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. वाद मिटवल्याचा राग मनात धरून १० ते ११ जणांच्या टोळक्याने मध्यस्थी करणाऱ्या तरुणाच्या घरात घुसून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि घरातील ८० हजार रुपयांची रोकड लुटून नेली.

हा प्रकार शनिवारी (दि.२६) रात्री १०:३० वाजता आयप्पा मंदिर रोड परिसरात घडला. एवढेच नव्हे तर, पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना या टोळक्याने रस्त्यात पुन्हा मारहाण केली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैभव काळे, विशाल काळे, एकनाथ काळे, विकास चव्हाण, आशिष नाईकवाडे, अमोल क्षीरसागर, जय भांबड, सौरभ सूर्यवंशी, साईनाथ काळे आणि इतर दोन-तीन अनोळखी इसम (सर्व रा. आयप्पा मंदिराजवळ) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी रवींद्र बाळासाहेब तोगे (४४, रा. एसबीआय एटीएमसमोर, आयप्पा मंदिरजवळ) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे मित्र श्याम पोपळघट आणि काळे कुटुंबात शनिवारी (दि. २६) रात्री वाद झाला होता.

रवींद्र यांनी हा वाद मिटवला आणि ते स्वतःच्या घरात गेले. मात्र, तू आमच्यात कशाला तोंड खुपसले, आता तुलाही दाखवतो असे म्हणत रात्री साडेदहाच्या सुमारास सर्व आरोपी रवींद्र यांच्या घरात घुसले. त्यांनी रवींद्र यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रवींद्र हे खाली पडताच टीव्ही शोकेसच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले ८० हजार रुपये रोख आरोपींनी हिसकावून नेले.

या घटनेनंतर घाबरलेल्या रवींद्र यांनी आपला भाऊ नितीन तोगे याला फोन करून बोलावून घेतले. रवींद्र हे त्यांचा भाऊ नितीन, मित्र श्याम पोपळघट आणि ज्ञानेश्वर राठोड यांच्यासोबत सातारा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना आमदार रोडवर पुन्हा अडवले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT