छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांसाठी नव्याने टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून दोन आठवडे दररोज वाढीव ३५ ते ४० एमएलडी पाण्याची मिळाले, परंतु ऐन खंडकाळ कमी करण्याचे नियोजन सुरू असतानाच पंपहाऊसच्या स्लॅब गळती लागली. त्यामुळे वाढीव पाणी बंद पडले. दुरुस्तीसाठी तीन दिवस लागणार असल्याने शहरवासीयांना वाढीव पाण्यासाठी आणखी चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरवासीयांसाठी २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे. या योजनेतून पहिल्या टप्प्यात शहरवासीयांना २०० एमएलडी वाढीव पाणी देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिली होते. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीने नव्या जलवाहिनीतून वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्याची तयारी सुरू केली होती.
परंतु मुख्य जलवाहिनीतून पाणी पुरवठा सुरू होताच जलवाहिनी आणि त्यानंतर एअर व्हॉल्व्ह फुटणे, त्यानंतर कधी जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी पुरवठा थांबविण्यात आला. सायफन पद्धतीने पाणी उपसा करण्यास अडथळा आला. परंतु १२ जूनपासून शहराला वाढीव पाणी सुरू केले. हळूहळू हे पाणी ३५ ते ४० एमएलडीपर्यंत वाढविण्यात आले. नक्षत्रवाडी एमबीआरमधून जून्या जलवाहिन्यांद्वारेच शहरात पाणी आणले गेले. या वाढीव पाण्याचा आधार घेत महापालिकेने शहरातील पाण्याचा खंडकाळ दोन दिवसांनी कमी करण्याची तयारी सुरू केली होती,
मात्र त्यापूर्वीचा नक्षत्रवाडी एमबीआर येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ उभारण्यात आलेल्या पंपगृहाच्या स्लॅबला अचानक गळती लागली. या गळतीमुळे पंपगृह तातडीने बंद करण्यात आले. त्यामुळे शहरात येणारे वाढीव पाणी मागील चास दिवसांपासून बंद आहे. दुरुस्तीसाठी आणखी तीन दिवस लागणार आहे. त्यामुळे शहरवासियांना वाढीव पाण्यासाठी पुढील चार दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सध्या किती पाणी मिळते ?
शहराला सध्या १७१ एमएलडी पाण्याचा पुरवठा होत आहे.
नव्या जलवाहिनीतून ३५ ते ४० एमएलडी वाढीव पाणी मिळत होते.
पंपगृहाच्या स्लॅबला गळती लागल्याने हा वाढीव पुरवठा तात्पुरता बंद आहे.
दुरुस्तीचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी आणखी तीन दिवस लागणार आहेत.
त्यानंतर वाढीव पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून शहरातील पाणीपुरवठ्याचा खंडकाळ कमी करण्याचे नियोजन आहे.