छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 100 दलली क्षमतेच्या योजनेवर गुरुवारी (दि.5) मध्यरात्री आणि शुक्रवारी (दि.6) सलग दोन मोठे तांत्रिक बिघाड झाले. मात्र महापालिका व संबंधित यंत्रणांनी रात्रंदिवस परिश्रम घेत हे दोन्ही बिघाड दुरुस्त केल्याने शुक्रवारी सकाळनंतर शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला असून 56 व 100 दलली क्षमतेच्या पाणीपुरवठा योजना कालबाह्य आणि जीर्ण झाल्याने अशा तांत्रिक अडचणी वारंवार उद्भवत असल्याचे पुन्हा समोर आले आहे.
क्रमांक एकच्या मोटार केबल कनेक्शनमधून धूर निघाल्याने ट्रिपिंग झाले आणि संपूर्ण पंपिंग बंद पडली. तपासणीअंती केबल जळाल्याचे आढळून आले. याचबरोबर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत बसविण्यात आलेल्या पंपाचा कॅपॅसिटर जळाल्याचे तसेच 1600 केव्हीए ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल बाहेर फेकले गेल्याने तो नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आले. मनपा कर्मचार्यांनी तत्काळ त्याची दुरुस्ती पूर्ण केली. त्यानंतर पहाटे 4.30 वाजता तीन पंप सुरू करण्यात आले.
दरम्यान दुपारी 1.40 वाजता पुन्हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी पंप बंद करून 2.40 वाजता पंपिंग सुरू करण्यात आली. मात्र त्याच वेळी ढोरकीन जवळ 100 दलली योजनेची 1200 मिमी व्यासाची मुख्य पाइपलाइन फुटल्याची माहिती मिळताच पंपिंग तातडीने बंद करण्यात आली. ढोरकीन परिसरात दुपारी 2.40 वाजता पाइपलाइन फुटल्याचे स्पष्ट झाले. या ठिकाणी 1200 मि.मी. पाइपलाइनवर 900 मिमी पाइपलाइन टाकून सिमेंट काँक्रीट केलेले असल्याने दुरुस्तीसाठी जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात खोदकाम करावे लागले.
नेमकी फुटी कुठे आहे, हे सायंकाळी साडेसहापर्यंत स्पष्ट न झाल्याने रात्रभर काम सुरू होते. अखेर शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत पाइपलाइन दुरुस्ती पूर्ण करण्यात आली. यानंतर जलकुंभ भरण्यास तीन ते चार तास लागले आणि त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत झाला. या काळात 1200 मिमी पाइपलाइन बंद असल्याने सिडको-हडकोसह अनेक भागांना निर्जळीचा सामना करावा लागला. मात्र 700 व 900 मिमी पाइपलाइन सुरू असल्याने जुन्या शहरात पाणी वितरण सुरू ठेवण्यात आले.
जीर्ण योजनांचा प्रश्न ऐरणीवर
56 व 100 दलली क्षमतेच्या पाणीपुरवठा योजना कालबाह्य आणि जीर्ण झाल्याने अशा तांत्रिक अडचणी वारंवार उद्भवत असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. जायकवाडी यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन वाईकर, उपअभियंता किरण धांडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला आहे.