छत्रपती संभाजीनगर : शहराला नवीन पाणीपुरवठा योजनेतून दररोज ३० एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध होत असतानाही अनेक भागांतील नागरिकांना सात ते नऊ दिवसांच्या अंतराने पाणी मिळत असल्याचे समोर आले आहे. त्यातच तब्बल ४५ हजार नळजोडण्या अद्याप प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी सोमवारी (दि.१०) महापालिका प्रशासनासोबत शहरातील पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि विकासकामांचा आढावा घेतला.
पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, शहरातील प्रमुख रस्ते आणि विविध विकासकामांबाबत सोमवारी आमदार अंबादास दानवे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेतली. यावेळी पाणीपुरवठ्याच्या चर्चेत उपलब्ध पाण्याचे समान वितरण आणि प्रलंबित नळजोडण्यांचा मुद्दा प्रमुख होता. यावेळी ४५ हजार नळजोडण्या देण्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती देण्यात आली. तसेच शहरातील पाणी पुरवठ्याचे अंतर कमी करण्यासाठी वितरण यंत्रणेची कार्यक्षमता तपासून आवश्यक उपाययोजना करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, शहरात दररोज सुमारे ५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. नव्या कचऱ्याच्या संकलनासोबतच जुन्या कचरा साठ्यांचा प्रश्नही कायम आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापनावर येणारा ताण कमी करण्यासाठी संकलन आणि विल्हेवाटीची व्यवस्था अधिक सक्षम करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यासह मिटमिटा सफारी पार्कसाठी झू प्राधिकरणाची परवानगी मिळविण्याच्या दृष्टीने प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. एन-६ येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान व पुतळ्याच्या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला. यावेळी मनपा गटनेते गणेश लोखंडे, माजी महापौर सुदाम सोनवणे, राशीद मामू, राजू इंगळे, किशोर कच्छवाह, बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, ज्ञानेश्वर डांगे, सचिन खैरे, सुनीता सोनवणे, वैशाली कोरडे उपस्थिती होते.
रखडलेल्या रस्त्यांच्या कामांना गती
शहरातील मंजूर तसेच प्रलंबित प्रमुख रस्ते विकासकामांची माहिती घेऊन रखडलेली कामे मार्गी लावण्याच्या सूचना दानवे यांनी केल्या. नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांशी संबंधित कामांना प्राधान्य देऊन विकासकामांना गती देण्यावर यावेळी भर देण्यात आला.