Chhatrapati Sambhajinagar Cyber Crime
छत्रपती संभाजीनगर : गुन्हेगारी करायची, पोलिसांच्या हातून अटक व्हायची आणि त्यानंतर चक्क पोलिसांच्या बंदोबस्तातील व्हिडिओवर दहशत निर्माण करणारे ऑडिओ लावून सोशल मीडियावर रिल्स व्हायरल करायच्या, असा काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरात समोर आला आहे.
‘एकच गेम वाजवणार, अख्खा जिल्हा गाजवणार’ आणि ‘जब हमारा वार होगा तब तुम्हारा भाई भी फरार होगा’ अशा आक्रमक संवादांचा वापर करून एका आरोपीच्या दोन रिल्स सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, या व्हिडिओंमध्ये आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पोलीस बंदोबस्तात त्याला न्यायालयात घेऊन जातानाची आणि न्यायालयातून बाहेर आणतानाची दृश्ये दिसत आहेत. या रिल्सना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.
एकीकडे पोलीस गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे पोलिसांच्या बंदोबस्तातील आरोपींचेच व्हिडिओ वापरून गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले जात असल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. आता या व्हायरल रिल्सची वाळूज एमआयडीसी पोलिसांकडून दखल घेतली जाणार का? संबंधितांवर काही कारवाई होणार का? याकडे लक्ष लागले आहे.