टीव्हीसेंटर येथील याच जागेवरील मोठमोठी वृक्ष तोडून जागेचे असे सपाटीकरण करण्यात येत आहे. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar : टीव्हीसेंटर चौकातील ऑक्सिजन हबवर कु-हाड

मनपाचा भूखंड विकासकाच्या घशात, उद्यानाच्या आरक्षित जागेत व्यापार संकुल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने टीव्हीसेंटर चौकात उद्यानासाठी राखीव असलेली जागा बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) तत्त्वावर विकासकाच्या घशात घातली आहे. या जागेत व्यापारी संकुल उभारण्याचे काम सध्या सुरू असून, विकासकाने परिसरातील नैसर्गिक टेकडीचे सपाटीकरण करून त्यात लावलेली शेकडो वृक्ष परवानगीविनाच तोडली आहेत. त्यामुळे नागरिकांनी वृक्षारोपण करून जतन केलेला हा ऑक्सिजन हब महापालिकेने उद्ध्‌वस्त केल्याने संताप व्यक्त होत आहे.

महापालिकेने टीव्हीसेंटर येथील क्रीडा संकुलालगतच्या खुल्या जागेत आणखी एक व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उद्यानाच्या राखीव जागेचे आरक्षण बदलून ती खासगी विकासकाच्या घशात टाकण्यात आली आहे. या व्यापारी संकुलात ५८ गाळे बांधली जाणार असून, त्याचे काम सध्या विकासकाने सुरू केले आहे. या जागेत २०१९-२०२० साली परिसरातील नागरिकांनी सुमारे ६०० ते ७०० वृक्षांची लागवड करून त्यांचे जतन केले होते. आज यातील शेकडो रोपांचे रूपांतर झाडांमध्ये झाले आहे. या झाडांमुळे परिसराची ओळख ऑक्सिजन हब म्हणून होत आहे.

दरम्यान, या नैसर्गिक वातावरणाचा लाभ घेत अनेक जण परिसरात व्यायामसाठी, मॉर्निंग वॉकसाठी येतात. त्याशिवाय काही तरुण या नैसर्गिक टेकडीचा आधार घेत पोलिस भरतीपूर्व मैदानाची तयारी करतात, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. परंतु मागील काही दिवसांपासून या जागेत महापालिकेने बीओटी तत्त्वावर बांधकाम सुरू केले आहे. विकासकाने या जागेत व्यापार संकुलासाठी सपाटीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यासाठी टेकडीही पोखरण्यात येत आहे. त्याचे सपाटीकरण करून त्यावरील शेकडो झाडे परवानगीविनाच तोडण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. या कामाविरोधात परिसरातील नागरिकांनी भारत माता बचाव मोहीम सुरू केली आहे.

१०-२० फुटांची झाडे तोडली

या परिसरात कोरोना महामारीपूर्वी व त्यानंतर येथील नागरिकांनी घनदाट वृक्षांची लागवड करण्यावर भर दिला. विविध प्रकारची तब्बल ८०० झाडांची लागवड या परिसरात करण्यात आली होती. त्यासर्व झाडांचे जनत करण्यात आले. मात्र आता त्यावरच कुराडीचे घाव चालविले जात असल्याचे पाहून नागरिक आता आंदोलनाच्या तयारीत आहेत.

आम्हाला खेळ द्या

महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी आम्हाला खेळू द्या हा उपक्रम राबवून शहराच्या विविध भागांत महापालिकेच्या खुल्या भूखंडाचा शोध घेतला. त्या जागा मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून दिल्या. असे असताना आता टीव्हीसेंटर येथील चिमुकल्यांसाठी एकमेव मैदान प्रशासन हिरावून घेत आहे. त्यामुळे मैदान वाचविण्यासाठी आता चिमुकल्यांसह नागरिकही सरसावले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT