ST BUS : पॉइंटवरील वाहकांच्या नाड्या आवळल्या  File Photo
छत्रपती संभाजीनगर

ST BUS : पॉइंटवरील वाहकांच्या नाड्या आवळल्या

व्हॉट्सअॅप ग्रुपवर दररोज हजेरी : मन मर्जीला चाप

पुढारी वृत्तसेवा

chhatrapati sambhajinagar ST BUS

जे. ई. देशकर

छत्रपती संभाजीनगर: प्रवाशांच्या सोयीसाठी गर्दी असलेल्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी एसटीने तिकीट देण्यासाठी वाहक नियुक्त केले आहेत. अशा पॉइंटवरील अनेक वाहकांचा स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप बनवला असून, त्यावर दररोज हजेरी घेण्यात येत आहे. यामुळे वाहकांच्या मनमर्जी कर्तव्याला चाप बसणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी विनावाहक बसमधून प्रवाशांना सेवा पुरवण्यात येत आहे. प्रवाशांच्या से वेसाठी गर्दीच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी वाहकांची नियुक्ती केलेली आहे. यामुळे त्या त्या परिसरातील प्रवाशांना थेट बसस्थानकात येण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यात अशा महत्त्वाच्या सुमारे ३२ ठिकाणी वाहकांचे पॉइंट देण्यात आले आहेत. या वाहकांना सकाळी ६ ते दुपारी २ व दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत दोन सत्रात कर्तव्य देण्यात येते. या ठिकाणी असणारे अनेक वाहक आपल्या मर्जीनुसार कर्तव्य करत असल्याची गंभीर बाब समोर आल्याने त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी आता स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप बनवण्यात आला आहे. हा ग्रुप रविवार (दि.९) पासून कार्यरत करण्यात आला आहे.

दररोज हजेरीसह क्रॉस चेकिंग

पॉइंटवरील वाहक कर्तव्यावर जाताच त्यांना त्या ठिकाणांहून ग्रुपवर मॅसेज टाकावा लागत आहे. यामुळे तो वाहक त्या ठिकाणी गेला किंवा नाही याची माहिती मिळेल आणि तो खरेच गेला की नाही याची खातरजमा मुख्यालयातून करण्यात येत आहे. त्यामुळे आता मनमर्जी कर्तव्य करत आलेल्या वाहकांची चांगलीच गोची झाली आहे.

प्रवासी सेवेला प्राधान्य प्रवाशांना चांगली सेवा देणे पहिले कर्तव्य आहे. वाहकांची नियुक्तीच त्यासाठी केली आहे. अशातही अनेक जण आपल्या मर्जीनुसार कर्तव्य करत आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपमुळे कर्तव्यात कसूर करणारे समोर येतील. अशा वाहकांवर वेळीच योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
- प्रमोद नेहूल, विभाग नियंत्रक

...तर गैरहजेरी पडणार

जे वाहक पॉइंटवर कर्तव्य करत आहेत, त्यांनी कर्तव्यावर आल्याबरोबर मेसेज टाकला नसेल तर याची माहिती संबंधित आगार प्रमुखाला देऊन याची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच उशिराने मेसेज टाकला तर त्याचे कारण विचारण्यात येणार आहे. एकंदरीत मर्जीतील वाहकांना सोयीचे कर्तव्य देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही मोठी पंचाईत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT