Kirit Somaiya  Pudhari Photo
छत्रपती संभाजीनगर

Kirit Somaiya Attack | 'सीआयएसएफच्या कमांडोमुळे मी वाचलो': सिल्लोड येथील हल्ल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी सांगितला थरार

Chhatrapati Sambhajinagar News | सिल्लोड येथील पोलिस व तहसीलदार कार्यालयाबाहेर गाडीवर हल्ला

पुढारी वृत्तसेवा

BJP Leader Kirit Somaiya Attack in Sillod

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे हल्ला झाला. सोमय्या हे ११०० बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या फसवणुकीसंदर्भात पुरावे सादर करण्यासाठी सिल्लोड येथील पोलिस व तहसीलदार कार्यालयात गेले असता, कार्यालयाबाहेर काही जणांनी त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला. मात्र सीआयएसएफ कमांडोंच्या सतर्कतेमुळे जीव वाचल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सोमय्या म्हणाले, “माझ्या गाडीवर पाच जणांनी हल्ला केला. हा प्रकार उद्धव ठाकरे गट, काँग्रेस किंवा अब्दुल सत्तार यांच्या निकटवर्तीयांनी केला असो, पण दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. सीआयएसएफ सुरक्षा दलाने वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे मी सुखरूप आहे.”

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सुमारे २.२४ लाख अपात्र व बेकायदेशीर व्यक्तींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे मिळवली आहेत. त्याविरोधात माझा लढा सुरूच राहणार आहे. सिल्लोडमध्ये पुरावे सादर केल्यानंतर सोमय्या जळगावात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेण्यासाठी आले.

या भेटीत त्यांनी जळगाव जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या ४२ बांगलादेशी नागरिकांचा मुद्दाही उपस्थित केला. “या प्रकरणात पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही. ४३ जणांनी तहसीलदारांचे खोटे हस्ताक्षर वापरून प्रमाणपत्र घेतले आहेत. त्यांना आरोपी बनवलेच पाहिजे. पोलिसांना न्यायाधीश बनण्याचा अधिकार नाही. ज्यांनी खोटी कागदपत्रे दिली आहेत, त्यांच्यावर गुन्हा नोंदवणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. सिल्लोड परिसरात मालेगावप्रमाणे वातावरण करण्याचा कट दिसून येतो आहे. बांगलादेशी व अपात्र लोकांविरोधात ठोस पावले उचलली नाहीत, तर मला थेट मुख्यमंत्र्यांशी बोलावे लागेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सोमय्या जिल्हाधिकारी आयुष प्रसंग यांची भेट घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले असता सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी निषेध करण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्हा पेठ पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करून त्यांना ताब्यात घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT