सुनील कच्छवे
छत्रपती संभाजीनगर: सत्ताधारी शिवसेनेकडून महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी यावेळी तब्बल ८४९ जण इच्छुक आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मध्यवर्ती कार्यालयात या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. मात्र उमेदवारांची निवड ही केवळ मुलाखतीतून होणार नाही. सध्या शिंदेंच्या सेनेकडून शहरात खासगी एजन्सीमार्फत सर्व्हे सुरू आहे. त्यात नाव आलेल्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.
तब्बल दहा वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक होत आहे. त्यामुळे यंदा सर्वच पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक आहे. त्यातही सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेनेकडे उमेदवारीसाठी रीघ लागली आहे. पक्षाच्यावतीने इच्छुकांना आधी अर्ज वाटप करण्यात आले होते. त्यानंतर हे भरलेले अर्ज स्वीकारण्यात आले.
एकूण ८४९ जणांनी अर्ज दाखल केले. गेल्या दोन दिवसांपासून समर्थनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. एकेका प्रभागात तीस ते चाळीस जण इच्छूक आहे. त्यात शिवसेनेने ही निवडणूक महायुतीतील मित्र पक्षांसोबत एकत्रित लढण्याचे ठरविले आहे. परिणामी, पक्षाच्या वाट्याला ११५ पैकी निम्म्या जागाच मिळण्याची शक्यता आहे. उमेदवार निवडीत मोठी स्पर्धा आहे.
अशाच आता पक्षाने शहरात सर्वेक्षणासाठी मुंबईची एजन्सी नियुक्त केली आहे. सध्या या एजन्सीकडून सर्व्हे सुरू आहे. कोणत्या प्रभागात कोण प्रबळ आहे, निवडून येण्याची क्षमता कोणात आहे याची चाचपणी केली जात आहे. सर्व्हेत नाव येणाऱ्यानाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
पक्षाकडून रसद मिळण्याच्या शक्यतेने गर्दी
महापालिकेच्या २०१५ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे २९ उमेदवार विजयी झाले होते. मध्यंतरी शिवसेनेत विभाजन झाल्यानंतर ठाकरेंसोबतचे जवळपास २० माजी नगरसेवक आता शिंदेंच्या सेनेत दाखल झाले आहेत. मागीलवेळी वॉर्ड पद्धतीने निवडणूक झाली होती. प्रत्येक वॉर्ड हा सरासरी ८ ते १० हजार लोकसंख्येचा होता. यावेळी प्रभाग पद्धत लागू झाली असून, प्रत्येक प्रभाग हा सरासरी ४० हजार लोकसंख्येचा आहे. त्यामुळे व्याप्तीच्या दृष्टीने उमेदवारांसाठी ही निवडणूक अवघड ठरणार आहे. शिवाय उमेदवारांचा करावा लागणारा खर्चही वाढणार आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेकडे उमेदवारांचा ओढा वाढला आहे.