Pregnant Woman Assault 
छत्रपती संभाजीनगर

Pregnant Woman Assault | गर्भवती महिलेवर हात उचलणाऱ्या मुजोरांना धडा; शहागंजमध्ये 30 दुकानांचे शेड जमीनदोस्त

Pregnant Woman Assault | जंजाळ यांच्या आदेशाने कारवाई; ३५ हातगाड्या जप्त, ३० शेड जमीनदोस्त

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

शहागंज भागात तीन मुजोर व्यावसायिकांनी एका गर्भवती महिलेसह तिच्या पतीला बुधवारी (दि. २५) सायंकाळी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी महापालिका आयुक्तांशी संवाद साधत शहागंज अतिक्रमणमुक्त करण्याची सूचना केली होती. त्यावरून गुरुवारी सकाळपासूनच महापालिकेच्या पथकाने परिसरातील अतिक्रमणावर बुलडोझर चालविला.

या कारवाईत ३० दुकानांचे शेड जमीनदोस्त करण्यात आले, तर ३५ हातगाड्या जप्त केल्या. या धडक मोहिमेनंतर दिवसभर शहागंज परिसर हातगाडीमुक्त होता. शहराच्या मुख्य बाजारपेठेत मोडणाऱ्या शहागंज परिसरात हातगाड्यांमुळे सतत वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. यापूर्वी सात ते आठ वेळा महापालिकेने या हातगाड्यांवर जप्तीची कारवाई केली आहे. परंतु जप्त केलेल्या हातगाड्या पुन्हा परत केल्या जातात.

त्यामुळे हातगाडीधारकांची भररस्त्यात उभे राहून व्यवसाय करण्याची हिंमत वाढत आहे. यातूनच बुधवारी सायंकाळी या भागातील तीन व्यावसायिकांनी एका गर्भवती महिलेला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना कार्यकर्त्यांनी पाठविला होता. त्यानंतर जंजाळ यांनी पोलिस आयुक्तांशी संवाद साधत कठोर कारवाईची सूचना केली.

त्यासोबतच महापालिका आयुक्तांनाही अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून गुरुवारी सकाळपासून शहागंज भागात महापालिकेच्या पथकाने धडक मोहीम राबविली. ऐतिहासिक घडी टॉवरपासून ते महाराष्ट्र हिंदी विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सुमारे ३० हातगाडीधारकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

चार फळविक्रेत्यांचे दहा बाय दहाचे ओटे तसेच कच्चे पक्के बांधकाम जेसीबीने जमीनदोस्त केले. यात शेख अमान या व्यक्तीने विद्युत डीपीलगत पाच बाय सातचे लोखंडी अँगल व पत्रे वापरून अतिक्रमण केले होते. स्वतःच्या व इतरांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी त्याचे शेड काढून त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

मनपा आयुक्तांच्या आदेशाने अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी ही कारवाई केली. यावेळी अतिक्रमण हटाव विभागाच्या उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त (झोन क्रमांक तीन) शेख रफिक, संजय सुरडकर, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ यांच्यासह पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी, त्यांचे पथक आणि माजी सैनिक पथकाने ही कारवाई केली.

चार आरोपींना पोलिस कोठडी

शहागंज येथे फळे खरेदीसाठी गेलेल्या गर्भवती महिलेसह तिच्या पतीला दुचाकी लावण्याच्या कारणावरून फळ विक्रेत्यांच्या टोळक्याने जबर मारहाण करून महिलेचा विनयभंग केला. सिटी चौक पोलिसांनी चौघांना अटक केली. शेख सोहेल शेख बशीर, आदिल कय्युम शेख, इम्रान बशीर आणि शेख शहाबाज अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर मारहाण, अट्रॉसिटी, विनयभंग यासह अन्य कलमाखाली गुन्हा दाखल झाला. आरोपींना गुरुवारी (दि. २६) न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी दिली.

२५ व्यापाऱ्यांना नोटीस

या भागात कारवाईनंतर २५ व्यापाऱ्यांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी दिली.

जनावरे जप्त

या कारवाईवेळी पथकाला रस्त्यालगतच जनावरांचा एक गोठा आढळला. त्यातील दोन जनावरे जप्त करण्यात आली. एका चहाच्या दुकानाचे अंदाजे १५ बाय १० चे शेड जमीनदोस्त केले. झुणका-भाकर केंद्राच्या जागेत एकाने चहा, इडली, नाश्त्याचे हॉटेल व बांधकाम साहित्य विक्रीचे दुकान थाटले होते, तेही भुईसपाट करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT