छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या एक सीसीटीव्ही गावासाठी या अभिनव उपक्रमाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गावांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. ७३४ गावांनी सुमारे २ हजार ७८ सीसीटीव्ही बसविले. या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी लगेचच १८ गुन्ह्यांची उकलदेखील केली आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देणाऱ्या गावातील सरपंच, पोलिस पाटील आदींचा विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते २० आॅक्टोबर रोजी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
खबऱ्यांचे नेटवर्क हळूहळू कमी होऊ लागल्याने पोलिसांना गुन्ह्याची उकल करण्यासाठी आणि आरोपी शोधण्यासाठी तंत्रज्ञानाचीच मदत घ्यावी लागत आहे. त्यात सीसीटीव्ही अत्यंत उपयुक्त ठरतात. छत्रपती संभाजीनगर शहर स्मार्ट सिटीच्या यादीत आल्यावर शहरात महत्त्वाच्या चौकांमध्ये तब्बल ७०० सीसीटीव्ही बसविले. याचा शहर पोलिसांना चांगला फायदा होत आहे. ग्रामीण भागात सीसीटीव्ही नसल्यामुळे पोलिसांना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी एक सीसीटीव्ही गावासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेतला. त्यांनी गावागावात सीसीटीव्ही बसविण्यासाठी जनजागृती केली. सरपंच, पोलीस पाटील आदींनी त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. यातील मोजक्या ११३ गावांतील नागरिकांना बोलावून त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला अपर अधीक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, उपअधीक्षक जयदत्त भवर, दिनेशकुमार कोल्हे, पूजा नांगरे यांची उपस्थिती होती.
कुठल्याही शासकीय यंत्रणेपेक्षा सीसीटीव्ही कॅमेरे चोवीस तास, १२ महिने अहोरात्र सक्रिय असतात. भक्कम पुरावाही देतात. विशेष म्हणजे ते निप:क्ष असतात. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे हे सुजान समाजाचे लक्षण आहे. गाव, तालुका पातळीवर आता वाढदिवस, उत्सवामध्ये प्रत्येकाने एक तरी सीसीटीव्ही कॅमेरा गावाला देण्याची मोहिम हाती घ्यावी.
– डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, विशेष पोलिस महानिरीक्षक.
माझ्यासह अपर अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणेदार आदींनी गावागावात जाऊन सीसीटीव्हीचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील आदींनी शासकीय योजनेतून निधी उपलब्ध करून महत्त्वाच्या ठिकाणी हे सीसीटीव्ही बसविले आहेत. तीन महिन्यांतच ७३४ गावांमध्ये २ हजार ७८ कॅमेरे बसले आहेत. यात मोठ्या गावांपासून छोट्या गावांचाही समावेश आहे. गुन्हेगारांमध्ये या सीसीटीव्हींचा धाक निर्माण होईल. जिल्ह्यातील सर्व गावे सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणायची आहेत.
– मनीष कलवानिया, पोलिस अधीक्षक.