Illegal Cannabis Cultivation Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Ganja Seized | लालवण शिवारात गांजाची अवैध लागवड; ५२.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

१४१ गांजाची झाडे जप्त; १०५.१५ किलो गांजासह ६६ वर्षीय आरोपीला अटक

पुढारी वृत्तसेवा

Illegal Cannabis Cultivation

पिशोर : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या पिशोर पोलीस ठाण्याच्या पथकाने लालवण शिवारात गांजाच्या बेकायदेशीर लागवडीचा पर्दाफाश केला आहे. बुधवारी केलेल्या या कारवाईत गांजाची १४१ झाडे जप्त करण्यात आली. या झाडांचे एकूण वजन १०५.१५ किलो असून, जप्त मुद्देमालाची अंदाजित किंमत ५२ लाख ९७ हजार ५०० रुपये आहे. या प्रकरणी चैनसिंग रतनसिंग बिमरोटे (वय ६६, रा. लालवण, ता. फुलंब्री) याला पोलिसांनी अटक केली आहे.

गोपनीय माहितीवरून छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालवण येथील पाडळी एकफाटा शिवारातील शेत गट क्रमांक २८ मध्ये अवैधरीत्या गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने संबंधित शेतात छापा टाकला. यावेळी चैनसिंग बिमरोटे यांच्या शेतात कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता आर्थिक फायद्यासाठी गांजाची लागवड केल्याचे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

छाप्यादरम्यान पंचांच्या उपस्थितीत गांजाच्या झाडांची मोजणी करून ती जप्त करण्यात आली. एकूण १४१ झाडांचे वजन १०५.१५ किलो असून, त्यांची किंमत ५२ लाख ९७ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध अमली पदार्थ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि कन्नड उपविभागाच्या सहायक पोलीस अधीक्षक अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कन्नड शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक आरती पवार यांच्या उपस्थितीत आणि सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही मोहीम राबवली.

या पथकात सहायक फौजदार गजानन कराळे, पोलीस हवालदार परमेश्वर दराडे, कैलास करवंदे, दत्तू लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कव्वाल, कौतिक सपकाळ, पवन खंबाट, कृषी सहाय्यक नवनाथ खिल्लारे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील आय-बाईकचे अंमलदार जोनवाल, होमगार्ड नितीन शिंदे, गजानन सोनवणे तसेच कन्नड येथील फॉरेन्सिक पथकाचा सहभाग होता.

या कारवाईमुळे लालवण शिवारातील गांजाच्या अवैध लागवडीचा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT