Chhatrapati Sambhajinagar Cattle Smuggling Crackdown
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी गोवंश तस्करी आणि अवैध कत्तलीविरोधात धडक कारवाई केली आहे. जानेवारी ते 11 सप्टेंबर 2026 या कालावधीत 150 गुन्हे दाखल करून 300 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत 798 गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून, 24 हजार 264 किलो गोमांस आणि 114 वाहने जप्त करण्यात आली आहेत. एकूण 5 कोटी 59 लाख 22 हजार 715 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, खुलताबाद पोलिसांनी माटेगाव येथे अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून 47 गोवंश जनावरांची सुटका केली. यामध्ये 42 जिवंत आणि 5 कत्तल केलेल्या अवस्थेतील जनावरांचा समावेश आहे. चार वाहने जप्त करण्यात आली असून, कत्तलखान्याचा परिसर प्रशासनाच्या देखरेखीखाली पाडून उध्वस्त करण्यात आला. तर सिल्लोड शहर पोलिसांनी 28 गोवंश बैलांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला.
या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दोन आरोपी फरार आहेत. गोवंश तस्करी, गोमांस तस्करी आणि प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.