

उमेश काळे
पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार संजीव सान्याल हे अलीकडेच छत्रपती संभाजीनगरात झालेल्या एका चर्चासत्राला उपस्थित होते. त्यांच्यासमोर शहरात मेट्रो सुरू करण्यासाठी विस्तृत आराखडा मांडण्यात आला.
आशियातील सर्वात वेगाने वाढणारे शहर म्हणून २५ वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगरची नोंद घेतली जात होती. आज त्या यादीत इतर शहरांची नावे पुढे आली असली, तरी संभाजीनगरचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे, हे निर्विवाद आहे. चिकलठाणा, वाळूज आणि रेल्वेस्टेशन परिसरापुरतेच मर्यादित असलेले उद्योग क्षेत्र आता शेंद्रा आणि बिडकीनपर्यंत विस्तारले आहे. एका इटालियन मासिकाच्या अहवालानुसार, गुंतवणूक आणि उत्पादनवाढीच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगरचा जगातील पहिल्या पाच शहरांत समावेश केला आहे. हे भूषणावह आहे. विकासाचा वेग एकीकडे वाढत असताना भेडसावणार्या समस्यांवर मंथन आणि उपाययोजनाही गरजेच्या ठरतात. पुढील २० वर्षांत शहर कसे राहील, हे डोळ्यांसमोर ठेवून सीएमआयए आणि सीएसएन फर्स्ट या दोन औद्योगिक संस्थांच्या वतीने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या चर्चासत्राला पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार संजीव सान्याल उपस्थित होते. त्यांच्यासमोर शहराच्या भविष्यातील विकासाचा आराखडा मांडण्यात आला. त्यात पायाभूत सुविधांवर विशेष भर देत मेट्रो आणि आयआयटीसारख्या संस्थांची मागणी करण्यात आली.
मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न असतो. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हा त्यावरील प्रभावी उपाय मानला जातो. मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये बससेवेसोबत मेट्रो सुरू असतानाही वाहतूक प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही, तरी वाहतूक व्यवस्थेवर पडणारा ताण मेट्रो वा अन्य सेवांमुळे बर्यापैकी कमी होतो. त्यामुळे संभाजीनगरमध्ये मेट्रोची गरज आहे. ही मागणी प्रतिष्ठेसाठी नसून व्यवहार्य आहे. केंद्राच्या तांत्रिक निकषांनुसार मेट्रोसाठी प्रतितास, प्रतिदिशा किमान दहा हजार प्रवाशांची क्षमता आवश्यक आहे. क्रांती चौक ते शेंद्रा या सुमारे २० किलोमीटर मार्गावर १२,८९२ प्रवासी प्रतितास प्रवास करतात. त्यामुळे या मार्गावर मेट्रोची उपयोगिता स्पष्ट होते. पुढे क्रांती चौक ते बिडकीन आणि वाळूजपर्यंत मेट्रो विस्तारल्यास औद्योगिक परिसर आणि शहर यातील दळणवळण सुलभ होईल.
यापूर्वी छत्रपती संभाजीनगर विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या प्राथमिक आराखड्यात संभाजीनगर, गंगापूर, पैठण, खुलताबाद आणि फुलंब्री या पाच तालुक्यांतील ३१३ गावे आणि सुमारे २,१०० चौ. किमी. क्षेत्रासाठी मेट्रो व लोकलचा समावेश असल्याचे नमूद केले होते. डॉ. भागवत कराड हे अर्थ राज्यमंत्री असताना चार वर्षांपूर्वी महामेट्रोच्या अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत शेंद्रा ते पंढरपूर आणि बिडकीन ते हर्सूल या दोन मार्गांचे सादरीकरण झाले होते. चिकलठाणा, क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप, पंढरपूर, पैठण रोड, रेल्वे स्टेशन, बसस्थानक या धावपळीच्या भागाचा त्यात समावेश होता. शहरातील गर्दी टाळण्यासाठी चिकलठाणा ते वाळूज असा ओव्हरब्रीज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तयार करण्याचा आदेश दिला होता. या मेट्रोसाठीचा अंदाजित खर्च आठ हजार कोटी आहे; मात्र केवळ चर्चा करून विकास होणार नाही. त्यासाठी राजकीय नेतृत्वाची इच्छाशक्ती, प्रशासकीय गती आणि निधी आवश्यक आहे. औद्योगिक विकासाबरोबरच शिक्षण, पर्यटनात संभाजीनगरला संधी आहेत. परिसरातील अनेक खेड्यांमध्ये फ्लॅट संस्कृती पोहोचली असून, ही खेडी शहरी व्यवस्थेचा भाग बनत आहेत. मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहरात नवनवीन उद्योगांचे आगमन होत आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये संभाजीनगर नकाशावर आले आहे. २०-२५ वर्षांत शहराची लोकसंख्या दुप्पट होणार असून, रोजगार क्षमता वाढणार असेल, तर आजच सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारणे गरजेचे आहे.
मेट्रोसोबतच रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांचाही समांतर विकास झाला पाहिजे. वाढत्या लोकसंख्येला दर्जेदार जीवनमान मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी उच्च शिक्षण संस्था, तंत्रज्ञान केंद्रे आणि कौशल्य विकासाच्या संधी निर्माण कराव्या लागतील. मेट्रो उभारणीसोबत बससेवेचे जाळे अधिक सक्षम करून दोन्ही व्यवस्था परस्परपूरक करणे आवश्यक आहे. शहराचा विस्तार अनियंत्रित होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध वसाहतींची उभारणी करता येईल का, याचाही विचार करावयास हवा. पक्षीय मतभेद व श्रेयवाद बाजूला ठेवत दीर्घकालीन सार्वजनिक हिताला प्राधान्य यंत्रणेने दिले, तर विकासाची फळे सामान्य जनतेला चाखण्यास आनंदच वाटेल.