सिल्लोड- सुरत आणि जळगाव जिल्ह्यातील पाच तस्करांना अटक अंधश्रद्धेतून तस्करी होत असल्याचा संशय
वडोदबाजार पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल.
छत्रपती संभाजीनगर - जिल्ह्यात दुर्मीळ कासवाच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुप्तधन शोधणे आणि पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून दुर्मीळ कासवाची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. सिल्लोड मार्गे कारमधून दुर्मीळ कासवाची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने पाथरी टोलनाक्याजवळ सापळा रचत कारवाई केली.
या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेत त्यांना अटक करण्यात आली. अझ्तर खान पठाण, शेख अब्रार अहमद, साबीर खान मेवाती, शेख मुख्तार आणि सय्यद अब्रार अली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अझ्तर खान पठाण हा सुरतचा रहिवासी असून इतर आरोपी जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांच्या कारवाईत कारसह दुर्मीळ कासव जप्त करण्यात आले आहे. अंधश्रद्धेपोटी पैशांचा पाऊस पाडणे आणि गुप्तधन मिळवण्याच्या आमिषातून या कासवाची तस्करी केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वडोदबाजार पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.